२७१ चातुर्मासिक कलश स्थापन; दिगंबर जैन बांधवांनी रचला नवा विक्रम
By महेश सायखेडे | Updated: July 17, 2023 19:25 IST2023-07-17T19:25:14+5:302023-07-17T19:25:25+5:30
महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापना

२७१ चातुर्मासिक कलश स्थापन; दिगंबर जैन बांधवांनी रचला नवा विक्रम
वर्धा : दिगंबर जैन समाज बांधवांचा चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासाचे औचित्य साधून मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज वर्धा येथे असून, त्यांच्याच मार्गदर्शनात स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी तब्बल २७१ चातुर्मासिक कलश स्थापन केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात चातुर्मासिक कलश स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून, तो सध्या एक विक्रम ठरला आहे.
जैन मुनी कधीच एका ठिकाणी राहत नाहीत; पण पावसाळ्याच्या दिवसांत म्हणजेच चातुर्मास काळात ते जैन धर्माच्या शिकवणीला केंद्रस्थानी ठेवून एकाच ठिकाणी थांबतात. वर्धा शहरात सध्या मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी चातुर्मासाच्या सुरुवातीला वंजारी चौक भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिरात २७१ चातुर्मासिक कलशांची स्थापना केली. विशेष म्हणजे मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज अनेकान्त स्वाध्याय मंदिरात चातुर्मासाचे औचित्य साधून थांबले आहेत.
महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापना
चातुर्मासाचे औचित्य साधून ज्या ठिकाणी जैन मुनी राहतात, त्याच ठिकाणी जैन बांधव चातुर्मासिक कलश स्थापन करतात, तर चातुर्मास पूर्ण झाल्यावर हा कलश संबंधित कुटुंबाला दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही महाराजांनी केलीय सीमा निश्चित
चातुर्मासचे औचित्य साधून करण्यात आलेल्या कलश स्थापनेदरम्यान मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी सीमा निश्चित केली आहे. मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी ७० ते ८० किमीची सीमा निश्चित केली असल्याचे सांगण्यात आले.