उल्हासनगर: माजी नगरसेवक मंगल वाघे, माधव बगाडे भाजपातून पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
By सदानंद नाईक | Updated: December 27, 2025 18:43 IST2025-12-27T18:42:33+5:302025-12-27T18:43:11+5:30
Ulhasnagar Municipal Election महायुती झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा दिला इशारा

उल्हासनगर: माजी नगरसेवक मंगल वाघे, माधव बगाडे भाजपातून पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
Ulhasnagar Municipal Election | सदानंद नाईक, उल्हासनगर: भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक मंगल वाघे व माधव बघाडे यांनी घरवापसी कर ओमी टीम व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. महायुती झाल्यास ओमी टीम समर्थक काही नगरसेवकांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर ओमी कलानी टीमचे समर्थक नगरसेवक मंगल वाघे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे समर्थक नगरसेवक माधव बगाडे यांनी गेल्या महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. तसेच प्रदेशाध्यक्ष राजेश टेकचंदानी, राजेश वानखडे यांच्यासह अन्य जणांच्या घरी जाऊन भाजपात पक्ष प्रवेश दिला होता. गुरुवारी मंगल वाघे व माधव बगाडे यांनी घरवापसी केल्यावर ओमी टीमचे ओमी कलानी व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे भारत गंगोत्री यांनी त्यांचे स्वागत केले. बगाडे व वाघे यांनी घरवापसी केल्यानंतर यांना पक्ष उमेदवारी देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असलेतरी भाजपात इनकमिंग सुरू असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली.
दरम्यान, ओमी टीमचे समर्थक नगरसेवक गजानन शेळके, सविता रगडे-तोरणे, मालती करोतिया यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजप व शिंदेसेनेच्या महायुतीला विरोध केला. महायुती झाल्यास, आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे संकेत ओमी कलानी यांना दिले. याप्रकाराने ओमी टीम मधील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली. अशीच परिस्थिती शिंदेसेना, साई, भाजपात असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस,उद्धवसेना व मनसेचे जमले
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे व मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी महाविकास आघाडी झाल्याची कबुली दिली. ७८ पैकी २० जागा काँग्रेसच्या वाटेला तर ४० सीट उद्धवसेना व १८ सीट मनसेला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र ऐण वेळेवर यामध्ये बदल होण्याची शक्यता देशमुख यांनी दिले. शनिवारी पासून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करणे सुरू केल्याची माहिती काँग्रेसचे रोहित साळवे यांनी दिली.