उल्हासनगर महापालिकेचा शिक्षण मंडळासह अन्य विभाग वडलँड इमारतीत हलविले, गैरप्रकाराची शक्यता
By सदानंद नाईक | Updated: February 25, 2026 17:49 IST2026-02-25T17:49:13+5:302026-02-25T17:49:13+5:30
प्रशासक राजवट संपवून लोकशाही सुरू होताच शिक्षण मंडळ विभाग पुन्हा वूडलँड इमारती मध्ये हलविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेचा शिक्षण मंडळासह अन्य विभाग वडलँड इमारतीत हलविले, गैरप्रकाराची शक्यता
सदानंद नाईक, उल्हासनगर : शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, विभागात चोरी, गैरप्रकार आदीमुळे वादात सापडलेल्या शिक्षण मंडळ विभाग वूडलँड मधून महापालिका मुख्यालय येथे हलविण्यात आले होते. प्रशासक राजवट संपवून लोकशाही सुरू होताच शिक्षण मंडळ विभाग पुन्हा वूडलँड इमारती मध्ये हलविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्यांना दालन उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली, नेहमी वादात सापडलेल्या शिक्षण मंडळाच्या विभागासह अन्य दोन विभाग मुख्यालयातून पुन्हा वूडलँड इमारतीत हलविले आहे. अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. महापालिका मुख्यालयात शिक्षण मंडळ विभागाचे कार्यालय असताना महापालिका शाळेची संख्या ३२ तर मुलांची संख्या १४ हजार पेक्षा जास्त होती. मंडळाचे विभाग कार्यालय वूडलँड इमारती मध्ये हलविल्यावर विभागात सावळागोंधळ निर्माण होऊन, तत्कालीन प्रशासन अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यावर विनयभंग सारखे गुन्हे दाखल झाले होते. तसेच दामदुप्पट किंमतीला साहित्य खरेदी केल्याचा प्रकार उघड होऊन काही जणांच्या नियुक्तीबाबत प्रश्नचिन्हे निर्माण झाले होते.
महापालिका शिक्षण मंडळ वादात सापडल्यावर मंडळाचे कार्यालय तत्कालीन आयुक्तानी महापालिका मुख्यालयात हलविले. मात्र काही महिन्यातच शिक्षण मंडळ विभाग पुन्हा वूडलँड इमारती मध्ये स्थलांतरित झाले. शिक्षण मंडळातील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आल्यावर, तत्कालीन आयुक्तानी शिक्षण मंडळाचे कार्यालय पुन्हा महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आणले. गेल्या ५ वर्षापासून शिक्षण मंडळाचे विभागाचे कार्यालय सुरू आहे. दरम्यान या गोंधळात शाळाची संख्या ३२ वरून २२ तर विध्यार्थी संख्या १४ हजारावरून साडे चार हजारावर आली. सिंधी शाळा पूर्णतः बंद झाल्या असून एकमेव गुजराती शाळा शेवटची घटका मोजत आहे. तीच परिस्थिती मराठी व हिंदी शाळांची झाली आहे.
वूडलँड इमारती शिक्षण मंडळ नकोच
शिक्षण मंडळातील गोंधळामुळे वूडलँड इमारती मधून महापालिका मुख्यालयात दोन वेळा शिक्षण मंडळ विभाग कार्यालय आणले होते. पुन्हा शिक्षण विभाग वूडलँडला हलवील्याने, सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळांना चांगले दिवस येण्यासाठी शिक्षण मंडळाचे कार्यालयात वूडलँड इमारती मध्ये नकोच अशी मागणी होत आहे.