...तर नागरिक मतदानापासून जातील दूर; ठाण्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली खंत
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 26, 2025 10:00 IST2025-12-26T09:59:24+5:302025-12-26T10:00:07+5:30
निवडणुका केवळ पक्षीय समर्थकांच्या मतदानापुरत्या राहतील मर्यादित

...तर नागरिक मतदानापासून जातील दूर; ठाण्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली खंत
- प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी समाजाला दिशा दाखवायची असते, मात्र सध्या राजकीय वातावरणात ती दिशाच हरवल्याची भावना नागरिकांत वाढताना दिसते. निष्ठांतर, सत्तेसाठीची धडपड, विकासाच्या नावाखाली होणारी अपारदर्शक चर्चा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्यामुळे मतदार संभ्रमात आहे. राजकारणाचे हिडीस स्वरूप पाहून उबग आल्यास नागरिक मतदानापासून दूर जातील, अशी भीती ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केली.
सध्या कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, हेच सामान्य नागरिकांना समजेनासे झाले आहे. कालपर्यंत एका पक्षाचा समर्थक असलेली व्यक्ती आज दुसऱ्या पक्षात जाऊन बंद दाराआड ‘विकासाची’ चर्चा करते. मात्र प्रत्यक्षात नेमके काय घडते, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. सत्तेची हाव सर्वत्र दिसते. साहित्यिक उपक्रमांमध्ये राजकारण्यांचा सहभाग नाही, साहित्यिकांची दखल घेतली जात नाही. कोणत्याही पक्षाला मराठी भाषा आणि संस्कृतीची खरी काळजी असल्याचे दिसत नाही.
डॉ. महेश केळुस्कर, कवी
सकल
समाजाला
दिशा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना, स्वतःची नेमकी दिशा सापडली आहे का?
असा प्रश्न पडावा असे राजकीय वातावरण आहे. एक भारतीय
नागरिक म्हणून व्यथित व्हावे असा निष्ठांतराचा खेळ, केवळ अत्यंत
सवंग शब्दांत काढलेली उणीदुणी, लोभाचे ओंगळ प्रदर्शन असे आजचे चित्र आता यापुढे असेच घरंगळत जाणार असे दिसते. या वातावरणात संवेदनशील नागरिक म्हणून
मत तरी काय व्यक्त करणार?
ही वैचारिक हतबलता, हीच
माझी अत्यंत प्रामाणिक
प्रतिक्रिया आहे.
प्रवीण दवणे, कवी, लेखक
शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवायची असतील तर किमान पदवीधर नगरसेवकांची गरज आहे; अडाणी प्रतिनिधी नेमून त्याचा काहीही उपयोग नाही. हल्ली एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारताना लोकशाहीचीच गळचेपी होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. सध्या राजकारण्यांमध्ये केवळ चुरस सुरू असून, महापालिका ताब्यात घेण्यासाठी धडपड चालली आहे, कारण त्यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र या सत्ताकारणात सामान्य माणूस, त्याची गरिबी, समाज आणि परिसरातील वास्तव परिस्थिती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे. अशा प्रकारचे नगरसेवक आणि राजकीय पक्ष शेवटी जनतेचा विश्वासच घालवतील. परिणामी जनतेचा राजकारणातील रस कमी होईल आणि निवडणुका केवळ पक्षीय समर्थकांच्या मतदानापुरत्याच मर्यादित राहतील.
अशोक बागवे, कवी
राजकारणाचा ढोल वाजू लागला आहे; पण सर्वसामान्य लोकांच्या मनात ‘नेमेची येतो मग पावसाळा’ तशा प्रकारचा भाव आहे. पक्ष बघून मत द्यावे तर उभी असलेली व्यक्ती नीट वाटत नाही आणि व्यक्ती बघून मत द्यावे तर तो पक्ष नीट वाटत नाही, अशी काहीशी अवस्था झाली आहे.
शिवाय नेमके कोण कोणाबरोबर आहे याचाही संभ्रम आहे.
नगरसेवक, नगरसेवक असे म्हणतो पण पुढे जाऊन सेवक हा शब्द मालकमध्ये बदलत जातो, असा अनुभव नवा नाही. असो, आलिया भोगासी....
सतीश सोळांकुरकर, लेखक