Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
By धीरज परब | Updated: December 29, 2025 12:55 IST2025-12-29T12:50:23+5:302025-12-29T12:55:10+5:30
महापालिका निवडणुकीतही भाजपा आणि शिंदेसेनेतील धुसफूस कायम आहे. भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपाकडून शिंदेसेनेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसत आहे.

Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
-धीरज परब, मीरारोड
महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असेलेली ठाणे महापालिका आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत दोंघांनी युतीत लढण्याची तयारी जवळपास निश्चित केली आहे. परंतु स्वतःचे बालेकिल्ले राखताना शिंदे यांनी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई मात्र वाऱ्यावर सोडले आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून शिंदेसेनेला युतीच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याची माहिती आहे.
ठाणे जिल्हा हा शिंदेसेनेचा अर्थात एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा बालेकिल्ला म्हणून महापालिका निवडणुकीत भक्कम करतील अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना होती. शिवाय महापालिकांशी संबंधित नगरविकास खाते देखील शिंदे यांच्याकडेच आहे.
भाजपासमोर शिंदेसेनेची शरणागती?
राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी महापालिकांमध्ये भाजपासोबत युती होत असताना ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा या महापालिकांमध्ये मात्र शिंदेसेनेने भाजपासमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिका ही शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहेच, तेवढीच प्रतिष्ठा त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत लागलेली आहे. कडोंम हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होमपीच आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि चव्हाण यांनी एकमेकांशी जुळवून घेत युती करण्यावर भर दिला आहे.
भाजपा-शिंदेसेना किती जागा लढवणार?
त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेत १३१ पैकी शिंदेसेना ९१ तर भाजपा ४० अशी वाटपाची चर्चा आहे. पूर्वी या महापालिकेत शिवसेनेच्या ६७, तर भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या होत्या.
कल्याण डोंबिवलीमध्ये देखील शिंदेसेना ६४, तर भाजपा ५८ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये युती केल्याने शिंदेसेना आणि भाजपा दोघांचाही फायदा होण्याचे वरिष्ठांचे अंदाज आहेत.
मीरा भाईंदर, नवी मुंबईत काय?
मीरा भाईंदरमध्ये ९५ पैकी २०१७ साली भाजपा ६१ आणि शिवसेना २२ जागी जिंकली होती. त्यातही मागच्या ६ वर्षात शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शहरात शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. परंतु या ठिकाणी भाजपाकडून सेनेला केवळ १३ जागा देऊ केल्या व त्यादेखील भाजपाच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही असे हिणवले गेले.
दुसरीकडे नवी मुंबईत देखील मंत्री गणेश नाईक यांनी आपणच नवी मुंबईचे विकासकर्ते असल्याने १११ पैकी भाजपासाठी ९१ तर शिंदेसेनेला केवळ २० जागा देऊ केल्याची चर्चा आहे.
नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेत शिंदेसेनेची ताकद वाढवण्याची संधी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. भाजपासोबत ठाणे व कल्याण-डोंबिवलीमध्ये युती केली तशीच युती नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये व्हावी, अशी भूमिका शिंदेसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून घेतली गेली होती.
स्वतः उमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे म्हटले होते.
दोन महापालिकांमध्ये शिंदेसेनेला हद्दपार करण्याची खेळी?
राजकीय फायद्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत युती होणार तर दुसरीकडे मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये मात्र भाजपाने शिंदेसेनेला पुरते नमवून ठेवले आहे. भाजपाचे बळ जास्त असल्याने तेथे शिंदेसेनेला मोजक्या जागा देण्याची तयारी दर्शवत युती होणारच नाही, अशी खेळी भाजपाने खेळली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपा युती न करता स्वबळावर लढून शिंदेसेनेला पालिकेतून हद्दपार करण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच भाजपाने कोंडी केली? की शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वतःचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी नवी मुंबई व मीरा भाईंदरमध्ये युतीसाठी फारसे वजन वापरणे टाळले? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहे.