TMC Election 2026: ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध
By अजित मांडके | Updated: January 2, 2026 17:40 IST2026-01-02T17:38:48+5:302026-01-02T17:40:11+5:30
Thane Municipal Election Results 2026: अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सहा महिला आणि एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही शिंदे यांचे निकवर्तीय मानले जात आहेत.

TMC Election 2026: ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध
- अजित मांडके
ठाणे -अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सहा महिला आणि एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही शिंदे यांचे निकवर्तीय मानले जात आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत ९९ अर्ज बाद झाले, तर १ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे ८९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच २ जानेवारीला अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने वागळे इस्टेट आणि वर्तकनगर भागात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे सर्व उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील आहेत. काही इतर प्रभागांमध्येही बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्या ठिकाणी शिंदे सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
प्रभाग क्रमांक १८ मधून जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे बिनविरोध निवडून आले. या प्रभागातील पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यात यश आले नाही. त्यामुळे या प्रभागातील दिपक वेतकर यांची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
दरम्यान, सावरकरनगरमधील प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर मनसेच्या रेश्मा चौधरी यांचा अर्ज बाद झाला. परिणामी शिंदे सेनेच्या शितल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या. याशिवाय किसननगरमधील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर, तर वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधून जयश्री डेव्हीड आणि सुलेखा चव्हाण या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.