मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपकडून शिवसेना टार्गेट, बजेट सादर करताना घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:09 AM2021-02-06T04:09:35+5:302021-02-06T04:10:00+5:30

TMC Budget : ठाणे महापालिकेचा २०१४ पासून मागील वर्षापर्यंतचा अर्थसंकल्प मंजूर कधी केला, त्याची अंमलबजावणी कधी झाली, असे सवाल स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी केले.

Shiv Sena targets by BJP with allied Congress-NCP | मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपकडून शिवसेना टार्गेट, बजेट सादर करताना घातला गोंधळ

मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपकडून शिवसेना टार्गेट, बजेट सादर करताना घातला गोंधळ

Next

ठाणे : ठाणे महापालिकेचा २०१४ पासून मागील वर्षापर्यंतचा अर्थसंकल्प मंजूर कधी केला, त्याची अंमलबजावणी कधी झाली, असे सवाल स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी केले. मागील वर्षी स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणताही ठराव न घेता ४५५ कोटींचा प्रस्ताव मंजूर कसा झाला, असा सवाल करून ‘चोर है’चा नारा देत, ‘मांडवली बादशहा हाय हाय’च्या घाेषणा देऊन या सदस्यांनी थेट शिवसेनेलाच टार्गेट केले. दरम्यान, या वेळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीदेखील झाली. तब्बल अर्धा तास चाललेला गोंधळ न थांबल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी त्यातच अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण केले.

महापालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे स्थायी समितीच्या सभागृहात आले होते. परंतु, सभा सुरू होण्याआधीच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी २०१४ पासूनचे अर्थसंकल्प कधी मांडले आणि ते कधी मंजूर केले? याची माहिती मागितली. अर्थसंकल्पातून फक्त दिवास्वप्ने दाखविली जातात. मात्र, ठराव दुसरेच केले जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. मागील वर्षी स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्पातील ठराव गुंडाळून ४५५ कोटींचे कोणते ठराव मंजूर करून घेतले, असा सवाल काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी केला. महासभेतही तो मंजूर झालेला नाही, असे असतानाही तो आलाच कसा, असा सवाल करून मनपातील दोनच जण ठराव करतात का? असा गंभीर आरोपही त्यांनी केला. निधीसाठी नगरसेवकांना वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या जोडीला भाजपचे सदस्यही आक्रमक झाले. जुन्या अर्थसंकल्पाची माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्हाला नवीन अर्थसंकल्पाच्या चर्चेत व्हायचे नाही, असे त्यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेते शानु पठाण हेही या वेळी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी जगदाळे यांचा मुद्दा लावून धरून ४५५ कोटींच्या कामांची यादी कोणी तयार केली हे समोर आले पाहिजे, अशी मागणी केली. मनपातील ते दोनच जण अशा पद्धतीने निधी नेत असतील तर इतर नगरसेवकांनी करायचे काय, असा सवाल भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला. 
 
ठाणे महापालिकेत चोरांचा खेळ
ठामपात चोरांचा खेळ सुरू झाला असून त्यासाठी मांडवली बादशहाही काम करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या वेळी त्यांनी चोर कंपनीविरोधात घोषणाबाजीस सुरुवात केली. भाजपचे भरत चव्हाण यांनी ही दुसरी नंदलाल समिती होणार असल्याचा आरोप केला. याचदरम्यान सदस्यांनी सचिव अशोक बुरपुल्ले यांची बदली करण्याची मागणी केली. तसेच ‘बंद करा.. बंद करा.. मनमानी कारभार बंद करा’ या घोषणांसह ‘मांडवली बादशाह हाय हाय’, ‘चोरों की टोली’ अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. 

आम्ही नियमानुसार अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केलेला आहे. त्यानंतर पाच ते सहा दिवसांत स्थायी समितीत आणि त्यानंतर महासभेत यावर चर्चा होऊन १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे ते अधिकार त्यांचे आहेत, आम्ही आमचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. 
- डॉ. विपीन शर्मा , आयुक्त, ठामपा 

Web Title: Shiv Sena targets by BJP with allied Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.