'त्या दोन टाळक्यां मुळे महाविकास आघाडी झाली नाही', मीरा भाईंदरमध्ये मनसेने केला उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर दगाबाजीचा आरोप
By धीरज परब | Updated: December 31, 2025 18:38 IST2025-12-31T18:37:44+5:302025-12-31T18:38:02+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेच्या स्थानिक दोघा प्रमुखांनी उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांचे मराठी ऐक्याचे स्वप्न धुळीस मिळवत भाजपा - शिंदेसेनेच्या फायदासाठी मनसेशी दगाबाजी केल्याचा आरोप मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे.

'त्या दोन टाळक्यां मुळे महाविकास आघाडी झाली नाही', मीरा भाईंदरमध्ये मनसेने केला उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर दगाबाजीचा आरोप
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेच्या स्थानिक दोघा प्रमुखांनी उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांचे मराठी ऐक्याचे स्वप्न धुळीस मिळवत भाजपा - शिंदेसेनेच्या फायदासाठी मनसेशी दगाबाजी केल्याचा आरोप मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. काँग्रेस सोबत महाविकास आघाडी न होण्यास देखील हि दोन टकली कारणीभूत असल्याचे सांगत या बाबत दोन्ही पक्षप्रमुखां कडे लेखी तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
मीरा भाईंदर मध्ये उद्धवसेना, काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादी ( शरद पवार) यांच्यात आघाडी झालेली नाही. शहरात ठराविक अपवाद वगळता कोणत्याही एका पक्षाची शहरात ताकद नाही. त्यामुळे महाविकास आघाडी करण्यासाठी मनसे व काँग्रेसने सातत्याने पुढाकार घेतला. परंतु उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि जिल्हा समन्वयक मनोज मयेकर यांनी त्यांची लढण्याची व निवडून येण्याची क्षमता नाही तेथे देखिल अवास्तव जागांची मागणी करून आडेबाजी केली.
मनसेने ९५ पैकी केवळ १२ जागा घेतल्या. त्या १२ जागे पैकी प्रभाग ५, १२, १५, १६, २० व २४ मधील मनसेच्या एकूण ६ उमेदवारांसमोर सेनेने त्यांचे उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म दिले आहेत. म्हात्रे व मयेकर यांनी जाणीवपूर्वक उमेदवारांना पकडून पकडून आमच्या समोर एबी फॉर्म देऊन उभे केले आहे. ह्या दोघांच्या आडमुठेपणा आणि अवास्तव हव्यास पायी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी होऊ शकली नाही. काँग्रेस सोबत आघाडी झाली असती तर शहरात भाजपा व शिंदेसेनेला चांगली टक्कर देता आली असती असे संदीप राणे म्हणाले.
मनसेचे राणे यांनी केलेल्या आरोपा बाबत प्रभाकर म्हात्रे व मनोज मयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. तर उद्धवसेनेचे सागर सावंत यांनी देखील संपर्क साधून प्रतिसाद दिला नाही.