मीरा भाईंदरमधील आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी जागरूक नागरिकांची मोहीम
By धीरज परब | Updated: December 30, 2025 13:20 IST2025-12-30T13:11:56+5:302025-12-30T13:20:44+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पोलीस, पालिका आणि आचार संहिता पथक द्वारे आचार संहितेचे उल्लंघन करून भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असून अश्या भ्रष्ट प्रकारे निवडणुकीत निवडून येणारे नगरसेवक आणि त्यांचे नेते हे आणखी मोठे भ्रष्टाचार करतील असा संताप शहरातील जागरूक नागरिकांनी व्यक्त करत तक्रारींची मोहीम चालवली आहे.

मीरा भाईंदरमधील आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी जागरूक नागरिकांची मोहीम
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पोलीस, पालिका आणि आचार संहिता पथक द्वारे आचार संहितेचे उल्लंघन करून भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असून अश्या भ्रष्ट प्रकारे निवडणुकीत निवडून येणारे नगरसेवक आणि त्यांचे नेते हे आणखी मोठे भ्रष्टाचार करतील असा संताप शहरातील जागरूक नागरिकांनी व्यक्त करत तक्रारींची मोहीम चालवली आहे. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगासह पोलीस व महापालिके कडे तक्रारी देऊन कारवाई न करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांना निलंबित करा व तात्काळ आचार संहिता भंगचे गुन्हे दाखल करा अश्या ईमेल द्वारे तक्रारीची मोहीम जागरूक नागरिक मोठ्या संख्येने चालवत आहेत.
मिरा भाईंदर शहरात विविध राजकीय पक्ष व नेते, माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार हे उघडपणे तसेहच संस्थांच्या आड मतदारांना विविध प्रकारे लाच, प्रलोभन देत आहेत. हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या नावाखाली मतदारांना भेटवस्तू व कुपन वाटप करीत आहेत. धार्मिक स्थळी बस ने सहली आयोजित करत आहेत. विविध सोसायटी - गट, जातीय व धार्मिक, प्रांत आणि भाषा निहाय कार्यक्रम आयोजित करत आहेत.
आरोग्य आदी विविध शिबीर भरवत आहेत. ह्या अश्या विविध माध्यमातून मतदारांना उघडपणे भ्रष्ट मार्गाने मते मिळवण्यासाठी भुलवले जात आहे. महापालिकेच्या निधीतून चालणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी जाऊन सदर कामे ते करत असल्याचे मतदारांना भासवून त्याची प्रसिद्धी करत मतांसाठी गैरवापर करत आहेत.
आचार संहिता असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आमदार, माजी नगरसेवक - इच्छुक उमेदवार यांना सोबत नेऊन भाईंदर येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमींना शासकीय निधीतील धनादेश वाटप केले. त्याची संबंधित पक्षचे राजकीय लाभासाठी प्रसिद्धी करून घेतली. बंदरे व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी भाईंदरच्या उत्तन येथील राजकीय प्रचार सभेत व्यासपीठावर मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना बसवून उपस्थित मच्छीमाराना प्रभावित केले आदी अनेक तक्रारींचे मुद्दे नमूद केले आहेत.
मिरा भाईंदरमधील मोठ्या प्रमाणावरील आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होत असताना पोलीस आणि पालिका तसेच आचार संहिता पथके आदी ते रोखण्यासाठी काही करत नाहीच. उलट राजकारणी यांना उल्लंघन करण्यास मोकळे रान केले आहे. भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असताना देखील पोलीस आणि पालिका, आचार संहिता पथके कारवाई करत नाही आणि गुन्हे दाखल न करता भ्रष्टाचारास संरक्षण देत आहेत असे गंभीर आरोप केले आहेत.
सबळ पुराव्यांसह केलेल्या तक्रारींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत दोषी सर्व शासकीय व निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबन व शिस्तभंगची कारवाई करावी व निवडणूक कामकाजातून दूर करावे. स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी आदेशित करावी. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी कठोर निर्देश द्यावेत अशी मागणी तक्रारीत केली आहे. अशा उघड भ्रष्ट प्रकारांना निवडणुकीत मोकळे रान दिले गेल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दूषित झाली असून निवडणूक आयोगाने तातडीने व कठोर हस्तक्षेप करावा अशी विनंती नागरिकांनी केली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत येणारे नगरसेवक व पक्ष हे भ्रष्ट मार्गाने निवडणून आलेले नसावे यासाठी जागरूक नागरिकांनी हि मोहीम राबवत तक्रारीची लिंक बनवून जास्तीत जास्त तक्रारी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर कार्यरत जेम्स ऑफ मीरा भाईंदर ग्रुप, सत्यकाम फाउंडेशनचे ॲड कृष्णा गुप्ता आदींसह अनेक जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.