मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
By धीरज परब | Updated: January 5, 2026 18:02 IST2026-01-05T18:00:24+5:302026-01-05T18:02:41+5:30
Mira Bhayandar Municipal Election 2026: २४ पैकी तब्बल १३ प्रभागांमधील उमेदवारांची शपथपत्रेच दिसेनात...

मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
Mira Bhayandar Municipal Election 2026: धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: यंदाच्या मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये आणि महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार अजून सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही. आठवडा व्हायला आला तरी २४ पैकी तब्बल १३ प्रभागां मधील उमेदवारांची शपथपत्रेच अजून महापालिकेने स्वतःच्या संकेत स्थळावर अपलोड केलेली नाही. तर काही उमेदवारांची माहिती सार्वजनिक होऊ नये यासाठी संगनमताने केलेला डाव असल्याचा आरोप होत आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्या नंतर निवडणूक कामांच्या अनुषंगाने करायची आवश्यक उपाययोजना, यंत्र - साहित्य, मनुष्यबळ आदींचा विचार निवडणूक कार्यक्रम नुसार महापालिका प्रशासनाने केला पाहिजे होता. मात्र तो न केल्या गेल्याने यंदा निवडणूक कामकाज आणि त्याची माहिति अनेक दिवस गेले तरी नागरिकांना उपलब्ध होत नाही आहे.
पहिला उमेदवारी अर्ज हा २६ डिसेम्बर रोजी दाखल झाला होता. २९ डिसेम्बर रोजी पर्यंत ६५ उमेदवारांचे अर्ज आले. अर्ज दाखल करण्याच्या ३० डिसेम्बर रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारांची संख्या मोठी होती. तसे असले तरी ३० डिसेम्बर रोजी उमेदवारांचे अर्ज हे शपथपत्र सह महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले पाहिजे होते. कारण दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी छाननी असल्याने उमेदवारांना तसेच मतदारांना देखील हरकती बाबत उमेदवारांचे अर्ज तपासता आले असते.
मात्र छाननी आणि माघारीचा २ जानेवारी रोजीचा दिवस जाऊन आज ५ जानेवारी उजाडली तरी देखील महापालिकेच्या संकेतस्थळावर बाजूतांश उमेदवारांचे अर्ज - माहिती अजूनही अपलोड केलेली नाही. पालिकेच्या संकेतस्थळावर २४ प्रभाग पैकी प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ९, १०, ११, १२, १९, २०, २१ व २२ ह्या ११ प्रभागाचा शपथपत्र पेज वर अजूनही उल्लेखच नाही. हे प्रभागाच संकेत स्थळावर दिसत नाहीत.
प्रभाग २३ आणि २४ आणि उमेदवार यांची नावे दिसतात. मात्र त्या नावांवर क्लिक होत नाही आणि उमेदवारी अर्जच दिसत नाहीत कारण ते अजूनही अपलोड केलेले नाहीत. प्रभाग अठरा मधील उमेदवारांचे अर्ज हे अर्धवट टाकलेले असून केवळ पहिली ४ - ५ पानेच टाकलेली आहेत. प्रभाग १७ मधील काही ठराविक उमेदवारांची तर नावेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची शपथपत्र देखील अपलोड झालेली नाहीत. केवळ १, २, ६,७,८, १३, १४, १५, १६ ह्याच प्रभागातील सर्व उमेदवारांची शपथपत्र पूर्णपणे अपलोड केलेली आहेत.
विनोद मिश्रा ( नागरिक): मीरा भाईंदर महापालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बेजबाबदार कामकाजा मुळे सातत्याने अनेक घोळ सुरु आहेत. उमेदवारांची शपथपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात याची पूर्ण कल्पना असताना देखील महापालिकेने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. आठवडा व्हायला आला तरी निम्मे पेक्षा जास्त प्रभागातील उमेदवारांचे शपथपत्र हे संकेत स्थळावर न देणे गम्भीर आहे. काही उमेदवारांची माहिती लोकांना होऊ नये म्हणून संगनमताने हा प्रकार केल्याची चौकशी करावी. दिरंगाई बद्दल अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
राज घरत ( जनसंपर्क अधिकारी, महापालिका): निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून जशी माहिती येते तशी आम्ही लगेच संकेतस्थळावर अपलोड करत आहोत. आरओ कार्यालयातून माहिती न आल्याने उर्वरित उमेदवारांची शपथपत्र अजून अपलोड करता आलेली नाहीत.