ठाणे जिल्ह्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राणप्रतिष्ठापना, पोलिसांचाही चोख बंदोबस्त

By जितेंद्र कालेकर | Updated: August 30, 2022 22:54 IST2022-08-30T22:51:47+5:302022-08-30T22:54:49+5:30

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंधाच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून तसेच भीतीच्या छायेखाली गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे.

In Thane district, one and a half lakh bappas will be enshrined, police will also be well prepared | ठाणे जिल्ह्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राणप्रतिष्ठापना, पोलिसांचाही चोख बंदोबस्त

ठाणे जिल्ह्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राणप्रतिष्ठापना, पोलिसांचाही चोख बंदोबस्त

ठाणे : कोरोनाचे विघ्न आता दूर झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंगळवारपासूनच गणरायाच्या आगमनाच्या ठिकठिकाणी मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ठाणे शहरासह जिल्हाभर सुमारे दीड लाख बाप्पांच्या मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये घरगुती एक लाख ४० हजार ३६६ तर एक हजार ५२ सार्वजनिक बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन होत आहे. यानिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंधाच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून तसेच भीतीच्या छायेखाली गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनानेही उत्सावांवरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळेच यंदा अमाप उत्साहामध्ये हा सण साजरा होतानाचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जन मिरवणूकाही निर्बंधमुक्त झाल्या आहेत. त्यामुळेच ढोल ताशांच्या गजरात आ िण गुलालाची उधळण करीत गणेशोत्सव शहराशहरांमध्ये आणि गावागावात मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.

दरम्यान, ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात एक लाख ४० हजार ३६६ घरगुती तसेच एक हजार ५२ सार्वजनिक बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन हाेत आहे. तर मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रात ३८३ सार्वजनिक आणि १५ हजार १०८ घरगुती बाप्पांचे आगमन आज होणार आहे.

गणेशोत्सव काळात सुरक्षा व्यवस्था चाेख राहण्यासाठी ठाणे पोलिसांनी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. यासाठी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्यासह चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, सात उपायुक्त, १४ सहाय्यक आयुक्तांसाह २५९ अधिकारी आणि ६५० अंमलदार त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

रेकॉर्डवरील उपद्रवी व्यक्तींना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. तर सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे काेणतेही कृत्य न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा अफवा पसरविणाºयांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 

Web Title: In Thane district, one and a half lakh bappas will be enshrined, police will also be well prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.