मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
By धीरज परब | Updated: December 28, 2025 19:45 IST2025-12-28T19:44:35+5:302025-12-28T19:45:29+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: युतीच्या निर्णयसाठी स्थानिक नेत्यांना २४ तासांचा अल्टिमेटम

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
Mira Bhayander Municipal Corporation Election | धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेना युतीबाबत शुक्रवारच्या बैठकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी सेनेला १३ जागा देऊ केल्या आणि त्या जागा देखील भाजपाच्या बळावर निवडून येऊ शकतात असे म्हटले होते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. युतीबद्दलच्या बैठकीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष व स्थानिक पातळीवर बोलतो, असे सांगितल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस राहिले असून २४ तासात निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम देखील त्यांनी दिला आहे.
मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे स्थानिक नेते आ. नरेंद्र मेहता हे शिंदेसेनेशी युती करण्याच्या तयारीत नाहीत. सुरुवातीला त्यांनी सेनेला १७ जागा देण्यासह उरलेल्या नयानगर परिसरातील व अन्य १ अशा १३ जागा वाटून घेण्याचे म्हटले होते. नंतर संकल्प सभेत मंत्री सरनाईक यांचे नाव न घेता टीका व आरोप करत प्रचाराचा नारळ फोडला होता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेनेसोबत युती करण्यासाठी समन्वय समिती गठीत केली असता बैठकीआधीच पत्रकार परिषद घेऊन ६६ आमच्या आणि ८ राष्ट्रवादीला दिल्याने सेनेसोबत युतीची २१ जागांवर चर्चा होईल. सेनेने आमचे कार्यकर्ते परत करावेत व शिवार उद्यान पालिकेला परत करावे, अशा अटी ठेवल्या होत्या. आमच्या पाठिंब्याशिवाय सेनेची जागा येऊ शकत नाही. मात्र सेनेच्या बळावर जिंकता भाजपा जिंकेल अशी एकही जागा नाही सांगत आ. मेहतांनी सेनेला हिणवले होते. शुक्रवारी रात्री समितीची झालेली बैठक निष्फळ ठरली होती.
रविवारी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारच्या समितीच्या बैठकी बाबत माहिती दिली. शुक्रवारी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी कॉल करून बैठकीची वेळ विचारली त्यानुसार भाजपा कार्यालयात बैठकीसाठी गेलो असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी आपण कॉल केला होता असे मेहतांचे पत्रकार परिषदेतले म्हणणे खोडून काढले.
बैठकीत आ. मेहतांनी सेनेला केवळ १३ जागा देऊ केल्या व त्या जागा देखील आमच्या पाठिंब्याने जिंकता येतील. २०१७ पासून आता पर्यंत ३ लाख मतदार वाढले असून भाजपाची ताकद वाढली आहे असे सांगितले होते. त्यावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर पण लोकांनी मेहतांना पराभूत केले होते. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझे मताधिक्य वाढल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आज युती बाबत झालेल्या बैठकीची माहिती दिली आहे. ठाण्याच्या धर्तीवर इकडे पण युती व्हावी अशी भूमिका त्यांना सांगितली. मुख्यमंत्री यांनी देखील प्रदेशाध्यक्ष व स्थानिक पातळीवर आ. मेहतांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. मेहतांनी भाजपचे कार्यकर्ते परत करा अशी अट आपणास मान्य असून त्यांनी देखील आमचे घेतलेले नगरसेवक - कार्यकर्ते परत करावेत. एकीकडे भाजपा कार्यकर्ते परत करा असे मेहता सांगतात मात्र दुसरीकडे त्यांनी काल आमच्या विधार्थी सेनेचे २ पदाधिकारी भाजपात घेतले. त्यामुळे आज आम्ही देखील भाजपचे २०० कार्यकर्ते सेनेत घेतल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मीरारोडच्या शिवार उद्यान टाऊनपार्क आरक्षण बाबतची अट मेहतांनी टाकली आहे. परंतु हेच टाऊनपार्कचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय स्वतः मेहता यांनीच पालिकेत नगरसेवक असताना घेतला होता व त्यात त्यांची सही आहे. तसेच टाऊनपार्क चे आरक्षण ठेकेदारास देण्याचा निर्णय देखील मेहता नगरसेवक असताना महासभेत झाला आहे असा गौप्यस्फोट मंत्री सरनाईक यांनी केला. ठेकेदारास टाऊनपार्क देण्याचा ठराव मांडणारे हेरल बोर्जिस आणि त्यावेळच्या महापौर निर्मला सावळे हे दोघे देखील भाजपात आहेत असे ते म्हणाले.