उल्हासनगरातील ट्रांझिट कॅम्पसाठी आयुक्तांकडे साकडे, ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा गेला जीव
By सदानंद नाईक | Updated: May 5, 2025 20:25 IST2025-05-05T20:24:55+5:302025-05-05T20:25:24+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली.

उल्हासनगरातील ट्रांझिट कॅम्पसाठी आयुक्तांकडे साकडे, ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा गेला जीव
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली. त्यांनी याबाबत आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेत महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिवसाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनाचे औचित्य साधून महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह अन्य भाजप पक्षाच्या सहकार्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली. त्यांनी शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न उपस्थिती करून यापूर्वी ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा बळी गेल्याची माहिती दिली. मात्र कोसळलेल्या इमारती मधील बेघर झालेल्या नागरिकांना हक्काचे घर अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच बेघर नागरिकांना खुनी खड्डा येथील दिड एकर जागेत ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी वधारिया यांनी आयुक्ताकडे केली.
शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न जैसे थे असून कोसळलेल्या धोकादायक इमारतीची पुनरबांधनी झाली नाही. याबाबतही वधारिया यांनी आयुक्त आव्हाळे यांना माहिती दिली. येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन वेळी महापालिकेचा ट्रांझिट कॅम्प असावा. यासाठी ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी राजेश वधारिया यांनी केली. राज्य शासनाने ट्रांझिट कॅम्प उभारणीला मंजुरी देऊन त्यासाठी निधी दिल्याचे बोलले जात आहे.