उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट समाप्त, लोकशाही उत्सव सुरू, साडेतीन वर्षांनंतर महासभा गजबजणार
By सदानंद नाईक | Updated: February 2, 2026 18:30 IST2026-02-02T18:29:47+5:302026-02-02T18:30:07+5:30
अश्विनी निकम व अमर लुंड यांच्या महापौर व उपमहापौर पदावर होणार शिक्कामोर्तब

उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट समाप्त, लोकशाही उत्सव सुरू, साडेतीन वर्षांनंतर महासभा गजबजणार
- सदानंद नाईक
उल्हासनगर : गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपून पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सवाला सुरूवात होत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता महापालिका महासभा भरणार असून महापौर पदी अश्विनी निकम व उपमहापौर पदी अमर लुंड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदेसेना यांनी महायुती केली असून महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड केवळ औपचारिक उरली आहे. शिंदेसेनेतील ओमी कलानी टीमच्या अश्विनी निकम यांचा महापौर पदासाठी तर भाजपचे अमर लुंड यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज आले आहेत. यामुळे शहराला नवीन महापौर आणि उपमहापौर मंगळवारी मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने महासभागृहाची रंगरंगोटी करून नगरसेवकांसाठी आकर्षक नवीन खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर यांच्या ऐतिहासिक अशा जुन्या लाकडी खुर्च्यांनाच पॉलिश आणि दुरुस्ती करून त्यांचे वैभव जपण्यात आले आहे.
महापौर व उपमहापौर कार्यालये सज्ज
महापालिका महासभागृहा प्रमाणे महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनांचेही नूतनीकरण केले असून दोन्ही कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर आणि खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. कार्यालयाच्या कामकाजासाठी कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात आला आहे. आता केवळ मंगळवारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून, महापालिका सचिव कार्यालयही अद्यावत करण्याची मागणी जोर धरत आहे.
साडे तीन वर्षाची प्रशासकीय राजवट समूष्टात
साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर लोकप्रतिनिधींच्या हाती शहराची सूत्रे जात आहेत. नवीन ऊर्जा आणि उत्साहात शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.