Voting in Sangola this year has increased due to newcomers | नवमतदारांमुळे सांगोल्यात यंदा मतदानात झाली वाढ
नवमतदारांमुळे सांगोल्यात यंदा मतदानात झाली वाढ

ठळक मुद्देसांगोला विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत नवमतदारांमुळे मतदानात वाढ सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १ लाख ९७ हजार मतदान झाले होतेगतवेळच्या तुलनेत यंदा १७ हजार मतदान वाढले असले तरी टक्केवारीत घट झाली

अरुण लिगाडे

सांगोला : सांगोलाविधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत नवमतदारांमुळे मतदानात वाढ झाली आहे. २९१ बुथवर चुरशीने झालेल्या मतदानात १ लाख ११ हजार ९६० पुरुष तर ९९ हजार १७१ स्त्री असे एकूण २ लाख ११ हजार ३१ (७१.५२ टक्के) मतदारांनी हक्क बजावला. सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १ लाख ९७ हजार मतदान झाले होते. गतवेळच्या तुलनेत यंदा १७ हजार मतदान वाढले असले तरी टक्केवारीत घट झाली आहे. गतवर्षी ७२.९९ टक्के इतके मतदान झाले होते. नवमतदारांची संख्या वाढल्याने वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे निकालादिवशी स्पष्ट होईल.

विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीतील शेतीच्या पाण्यासह वाढती बेरोजगारी, डाळिंब प्रक्रिया केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय आदी विकासाचे मुद्दे प्रचारात होते; मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रथमच जातीचा मुद्दाही चांगलाच गाजला.   

सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना मित्रपक्षाचे अ‍ॅड. शहाजीबापू पाटील, शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख, अपक्ष राजश्री नागणे यांच्यासह २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सांगोला विधानसभा मतदारसंघात २ लाख ९३ हजार ९६९ मतदारांची संख्या आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ११ हजार ६९२ पुरुष व १० हजार ९०१ स्त्री असे एकूण २२ हजार ५९३ नवमतदारांची संख्या वाढली असून, त्यामध्ये ८ हजार ३०९ तरुण मतदारांची संख्या आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदानादिवशी सोमवारी २९१ बुथवर सर्व यंत्रणा सक्षमपणे राबविल्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

आ. गणपतराव देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीत स्वत: उभे न राहता बºयाच राजकीय घडामोडीनंतर आपले नातू डॉ. अनिकेत देशमुख तरुण चेहरा उमेदवार दिला आहे. आ. देशमुख यांनी ११ वेळा प्रतिनिधीत्व केल्यामुळे जनतेशी त्यांचा असलेला दांडगा संपर्क, पाणी चळवळ, पिढ्यानपिढ्याचा एकनिष्ठ मतदार व त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग, तरुण पिढीचा प्रचंड उत्साह आदी शेकाप उमेदवाराच्या जमेच्या बाजू आहेत. 

शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील सर्व ताकदीनिशी निवडणुकीत उतरले आहेत. ऐनवेळी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिलेला पाठिंबा, फॅबटेक उद्योग समूहाचे भाऊसाहेब रुपनर यांचा शिवसेनेत प्रवेश, तरुणांचे पाठबळ, प्रचार यंत्रणा तर एकवेळचा विजय वगळता पाचवेळा पराभूत झाल्याने यंदा ते सातव्यांदा निवडणुकीस सामोरे जात आहेत. अपक्ष उमेदवार राजश्री नागणे किती मते घेतात व कोणाची घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

विविध प्रश्नांमुळे निवडणूक अटीतटीची
- यंदाच्या निवडणुकीत तालुक्यातील टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना या शेतीच्या पाण्यासह वाढती बेरोजगारी, औद्योगिक वसाहत, वैद्यकीय महाविद्यालय, प्रांत कार्यालय आदी उमेदवारांचे प्रचारातील मुद्दे होते. शेतीच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला असला तरी तो अद्यापही तडीस गेला नाही. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणाचा प्रश्नही चांगलाच गाजल्यामुळे निवडणूक अटी-तटीची होईल, असे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Voting in Sangola this year has increased due to newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.