सोलापूर: राजकीय घडामोडींना वेग ! दोन माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
By आप्पासाहेब पाटील | Updated: December 27, 2025 19:10 IST2025-12-27T19:07:41+5:302025-12-27T19:10:09+5:30
Solapur Municipal Corporation Election : ॲड. यु. एन. बेरिया काँग्रेसला तर नलिनी चंदेले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

सोलापूर: राजकीय घडामोडींना वेग ! दोन माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Solapur Municipal Corporation Election | आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एका मागून एक धक्के बसत आहेत. शनिवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया व राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केला.
यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. गुरूवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीमधील दोन माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी आता सतर्क झाली आहे. सध्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली वाढल्या असून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. अजित पवारांच्या सुचनेनुसार संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात जागा वाटपासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. याचवेळी महायुतीकडे किती जागेची मागणी करायची याबाबतही चर्चा झाली. रविवारी सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे हे सोलापुरात येणार आहेत. राष्ट्रवादीकडे तब्बल ४६५ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.