सोलापूर: मविआचं ठरलं! काँग्रेस ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी (शप) गट २० तर माकप लढणार ७ जागा
By आप्पासाहेब पाटील | Updated: December 27, 2025 17:05 IST2025-12-27T17:04:18+5:302025-12-27T17:05:02+5:30
Solapur Municipal Corporation Election: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्णय झाल्याची माहिती

सोलापूर: मविआचं ठरलं! काँग्रेस ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी (शप) गट २० तर माकप लढणार ७ जागा
Solapur Municipal Corporation Election: आप्पासाहेब पाटील, साेलापूर: भाजपाविरोधात सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भातील बैठक शनिवारी झाली. या बैठकीत जागा वाटपावर एकमत झाले. यात काँग्रेस पक्ष ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी-शरद पवार गट २० तर मार्क्सवादी कम्युनिस्ट ७ जागा लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या जागा वाटपासंदर्भातील घोषणा शनिवारी दुपारी करण्यात आली. यावेळी माकपकडून आडम मास्तर, युसूफ मेजर, काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी-शरद पवार गटाकडून महेश गादेकर, भारत जाधव, शंकर पाटील, ठाकरेसेनेकडून शहराध्यक्ष अजय दासरी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, संतोष पाटील व मनसेकडूनही काही नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून जागा वाटपासाठी बैठकावर बैठका होत होत्या. राष्ट्रवादी-शरद पवार गट व ठाकरेसेनेच्या जागेवरून जागा वाटप लांबणीवर पडले होते. अखेर शनिवारी अंतिम बैठकीत तोडगा निघाला अन् जागा वाटप अंतिम करण्यात आले. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने रणनिती आखली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. ठाकरेसेनेच्या जागेतूनच मनसेलाही जागा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.