सोलापूर मनपा निवडणूक: दोन दिवसात २१०९ अर्जाची विक्री, एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही!
By आप्पासाहेब पाटील | Updated: December 24, 2025 18:38 IST2025-12-24T18:37:08+5:302025-12-24T18:38:18+5:30
एका अर्जासाठी १०० रुपये फी आकारली जात आहे.

सोलापूर मनपा निवडणूक: दोन दिवसात २१०९ अर्जाची विक्री, एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही!
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन दिवसात सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे २१०९ अर्जाची विक्री झाली आहे. या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची विक्री आणि अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. नाॅर्थकाेट प्रशालेत अर्ज विक्री आणि अर्ज भरण्यासाठी सात निवडणूक कार्यालये आहेत. एका अर्जासाठी १०० रुपये फी आकारली जात आहे. सर्व सात कार्यालयांच्या बाहेर सकाळी ११ वाजेपासून अर्ज घेण्यासाठी गर्दी झाली हाेती. नामनिर्देशनपत्रासाेबत राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली. मागील दोन दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्जाची मागणी होत आहे. महापालिका निवडणूक कार्यालयाने सुरळीत कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणूक कार्यालयात उमेदवार, सूचक, अनुमाेदक अशा तिघांना प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांना या ठिकाणी फाेटाे, व्हिडीओ काढता येणार नाही. उमेदवाराने फाेटाेची मागणी केली तर निवडणूक कार्यालय उपलब्ध करून देणार आहे. सूचक आणि अनुमाेदक त्याच प्रभागातील असावेत असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ता बंद
अर्ज भरण्यासाठी हाेणारी गर्दी पाहता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक ते नाॅर्थकाेट प्रशाला हा रस्ता दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. २५ आणि २८ डिसेंबर राेजी सुटी असणार आहे. अर्ज भरण्याच्या कालावधीत रस्ता बंद असणार आहे.