The percentage of the vote, though smooth, is 'as is' | चुरस असली तरी मतदानाची टक्केवारी ‘जैसे थे’

चुरस असली तरी मतदानाची टक्केवारी ‘जैसे थे’

ठळक मुद्देमतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरूग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झालेमतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : विधानसभा निवडणुकीत बार्शीविधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपूर्वी झाले एवढेच म्हणजे ७२ टक्के मतदान झाले आहे़ मतदान प्रक्रिया ही सुरळीतपणे मात्र थोडीशी संथगतीने झाली असली तरी तालुक्यात महायुती, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही उमेदवारांनी चुरशीने मतदान करून घेतले आहे़ यंदा तालुक्यात कुठेही भांडण-तंटे किंवा अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष़ 
बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांच्याशिवाय इतर ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सोपल व राऊत हे दोन गट प्रबळ आहेत़ त्यात यंदा प्रथमच वैराग भागातील असलेले निरंजन भूमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावत आहेत़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ७२ टक्के मतदान होते़ यंदा देखील ७२़३९ टक्केच मतदान झाले आहे़ केवळ मतदान वाढलेले असल्यामुळे आकड्याच्या खेळात दहा हजार मतदान हे जास्त झाले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत असलेल्या दिलीप सोपल यांनी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला व महायुतीची उमेदवारी मिळवली़ त्यामुळे भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून निवडणूक लढवली़ राष्ट्रवादीत असलेल्या निरंजन भूमकर यांनी सोपल यांच्या पाठीमागे न जाता राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन प्रथमच वैराग भागातील उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक यंदा सर्वार्थाने वेगळी अशी आहे.

मतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

तालुक्यात सर्वाधिक नव्वद  टक्के मतदान हे गाताचीवाडी या गावात झाले तर सर्वात कमी मतदान ५७ टक्के हे शहरातील १३० नंबर केंद्रावर झाले़ ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झाले आहे.

५० हजारांपर्यंत लागल्या पैजा
- मतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरू असून, आमच्या गावात बाण चालला बघा़़़ अन् तुमच्या गावात ट्रॅक्टरची लय हवा होती, असं ऐकायला आलंय ते खरं हाय का अशा आशयाचे संवाद बोलले जात आहेत़ अनेक ठिकाणी शंभर रुपयांपासून दहा ते पन्नास हजारांपर्यंत पैजा देखील लागल्या आहेत़ 

८२२ दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क
तालुक्यात असलेल्या पुरुष १,५९,६५९ पैकी १,१७,००९ यांनी तर महिला १,४६,२४० पैकी १,०४,४३४ आणि ११ पैकी ६ इतर असे एकूण ३,०५,९२० पैकी २,२१,४५२ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ११६१ दिव्यांगांपैकी ८२२ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला़ 

Web Title: The percentage of the vote, though smooth, is 'as is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.