The election is peaceful, without a hitch | गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत
गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत

ठळक मुद्दे२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : २०१४  साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अक्कलकोटविधानसभा निवडणुकीत यंदा नव्याने १३ हजार ७० मतदार वाढले आहेत. आता याचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यंदा काही ठिकाणच्या केंद्रांवर मतदारांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले़ प्रचारातही काही उमेदवारांनी काही मागील मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे ते फारसे प्रभावी ठरलेले नाही. एकूणच २० वर्षांनंतर गालबोट न लागता निवडणूक शांततेत झाली़ आरोप, प्रत्यारोपाविना ही निवडणूक पार पडली. त्यामुळे मतदानानंतर तालुक्यात वातावरण शांत राहिले आहे.

२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. आरोप-प्रत्यारोप, हाणामारी अशा अनेक घटना घडल्या़ तापलेल्या वातावरणातही ६३.९४ टक्के मतदान झाले होते.

यंदा नव्याने झालेल्या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही ६२.०२ टक्के मतदान झालेले आहे. यंदा वाढलेले नवमतदार कोणाच्या बाजूने जाणार हे निकालाअंतीच कळणार आहे. फायदा-तोटा कोणाला होणार? अशी चर्चा आता रंगत आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक बूथवर पिण्याचे पाणी आणि ज्येष्ठांना बराच वेळ रांगेत उभे राहण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले़ तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती़ अशा अनेक अडचणींना तोंड देत मतदारांनी मतदान केले. 

जुनेच मुद्दे उगाळले
- या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकरूख उपसा सिंचन व देगाव जोडकालवा योजना लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही देत मागील दहा वर्षांपासूनचे तेच ते मुद्दे प्रचारात उपस्थित केले. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील १५ वर्षांत रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगितले़ तडवळ-तिलाठी-कडबगाव, दुधनी रेल्वे उड्डाणपूल करू, अक्कलकोट शहरातील भुयारी गटार योजना करूश अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत.

गैरसोयींना तोंड देत केले मतदान 
- अक्कलकोट शहरातील एनटीसी शाळा मतदान केंद्र (क्र. १५३, १५४) मध्ये पावसामुळे पाणी साचले होते. अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सूचनेनंतर मोटार लावून पाण्याचा उपसा केला. त्या ठिकाणी चिखल, गळकी पत्रे, ज्येष्ठांची गैरसोय झाली. भोसगे गावीसुद्धा मतदान केंद्र चक्क धोकादायक इमारतीत होते. अशाच प्रकारे कासेगाव, मुस्ती या ठिकाणीही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले़

Web Title: The election is peaceful, without a hitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.