शेकापची २० वर्षांची सत्ता संपुष्टात; ‘गणपतआबां’चा सांगोला... घराणेशाहीमुळं बिथरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:20 PM2019-10-25T12:20:25+5:302019-10-25T12:24:52+5:30

Sangole Vidhan Sabha Election Results 2019:शहाजीबापू पाटील ७६८ मतांनी विजयी; प्रथमच यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जणू दिवाळी

Baramati Election Results 2019: shahajibapu patil vs ganpatrao deshmukh, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | शेकापची २० वर्षांची सत्ता संपुष्टात; ‘गणपतआबां’चा सांगोला... घराणेशाहीमुळं बिथरला!

शेकापची २० वर्षांची सत्ता संपुष्टात; ‘गणपतआबां’चा सांगोला... घराणेशाहीमुळं बिथरला!

googlenewsNext
ठळक मुद्दे शेकापची गेल्या २० वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना अखेर यश आ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा केवळ ७६८ मतांनी पराभव करीत निसटता विजय मिळविला अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना ९९ हजार ४६४ तर अनिकेत देशमुख यांना ९८ हजार ६९६ मते मिळाली

अरुण लिगाडे

सांगोला : अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीने झालेल्या निवडणुकीत शेकापची गेल्या २० वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना अखेर यश आले. त्यांनी आ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा केवळ ७६८ मतांनी पराभव करीत निसटता विजय मिळविला आहे. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना ९९ हजार ४६४ तर अनिकेत देशमुख यांना ९८ हजार ६९६ मते मिळाली. यामुळे शेकापचा ५० वर्षांपासूनचा गड केवळ घराणेशाहीमुळे उद्ध्वस्त झाला.

या निवडणुकीत पहिली फेरी ते अखेरच्या फेरीपर्यंत शहाजीबापू पाटील सातत्याने मताधिक्य मिळवत गेले़ पण हे मताधिक्य अल्प असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर शेवटच्या फेरीत शहाजीबापू पाटील यांनी शेकापचे अनिकेत देशमुख यांचा पराभव करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. शहाजीबापू पाटील विजयी झाल्याचे जाहीर करताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. या निवडणुकीत मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार राजश्री नागणे यांच्यासह १८ जणांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.

गुरुवारी सांगोला येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी घेण्यात येऊन ८़३० वाजता पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांना ४७९ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसºया, तिसºया, चौथ्या, पाचव्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. एकीकडे शहाजीबापू पाटील यांचे मताधिक्य वाढत असताना कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले होते, तर दुसरीकडे शेकापचे कार्यकर्ते पुढच्या फेरीत मताधिक्य घटेल व अनिकेत देशमुख यांचे मताधिक्य वाढेल, या आशेने मतमोजणी फेरीकडे लक्ष ठेवून होते.

मात्र तसे न घडता शहाजीबापू पाटील यांचे प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढत गेले. २१ फेºया पूर्ण झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना ९८ हजार ७६३ तर अनिकेत देशमुख यांना ९७ हजार ६८८ मते मिळाल्याने शहाजीबापू पाटील १०७५ मतांनी आघाडीवर होते. नेमके त्यादरम्यान पोस्टल मतांची मोजणी सुरू होती. परंतु विजयासाठी आसुसलेल्या उत्साहित कार्यकर्त्यांनी शहाजीबापू पाटील १ हजार ७५ मतांनी विजयी झाल्याचे सांगताच मतमोजणी कक्षाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके फोडण्यास सुरुवात केली. यावेळी पोस्टल मतांची मोजणी चालू असताना शेकापच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत देशमुख ९६ मतांनी विजयी झाल्याचे सांगून जल्लोषाला सुरुवात केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयापुढे समोरासमोर येऊन जल्लोष करू लागले.

कार्यकर्त्यांचा जमाव पोलिसांचे ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार करीत मतमोजणी कक्षापासून त्यांना हुसकावून लावले. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे याचा घोळ संपता संपेना. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मतमोजणी परिसरात चोहोबाजूला रस्त्यावरच ठाण मांडून होते. 
मतमोजणीदरम्यान पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी मतमोजणी परिसर व शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.

निकाल जाहीर करण्यापूर्वीच दोन्ही गटांचा जल्लोष...
- दरम्यानच्या काळात बूथ क्रमांक २०५ (चोपडी) ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्या बूथची मोजणी बाकी होती, तर शेकाप मतमोजणी प्रतिनिधींनी पोस्टल मतांच्या फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळे बाहेर कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. मताधिक्याचा घोळ आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली़ अखेर पोस्टल मतांची मोजणी व बूथ क्र. २०५ ची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सायंकाळी ५ च्या सुमारास अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांचा ७६८ मतांनी विजय झाल्याचे जाहीर करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले.

सांगोला तालुक्यातील जनता व मतदारांनी माझ्या सततच्या पराभवाची मालिका खंडित केली आहे़ सर्व मतदारांचे अनंत उपकार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरला. निवडणुकीत जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन मी व माजी आ़ दीपक साळुंखे-पाटील, भाऊसाहेब रूपनर, नगराध्यक्षा राणी माने, श्रीकांत देशमुख, आनंदा माने यांच्या सहकार्याने पूर्ण करीन.
- अ‍ॅड. शहाजीबापू पाटील
उमेदवार शिवसेना

क्षणचित्रे...

  • - पहिल्या फेरीपासूनच अ‍ॅड़ शहाजीबापू पाटील आघाडीवर
  • - शेकाप कार्यकर्त्यांमध्ये पुढच्या फेरीत तरी लीड मिळेल याची उत्सुकता
  • - चोपडी येथील बूथवरील मशीनमध्ये बिघाड
  • - शेकाप कार्यकर्त्याने उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर करताच जल्लोष, पण निवडणूक निर्णय अधिकाºयांनी अधिकृत घोषणा केली नव्हती.
  • - दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे पोलिसांचा सौम्य लाठीमार
  • - मतमोजणी स्थळाला चोख पोलीस बंदोबस्त

Web Title: Baramati Election Results 2019: shahajibapu patil vs ganpatrao deshmukh, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.