Question of Construction Welfare Association pending in Government Court | बांधकाम कल्याणकारी संघाचे प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित

बांधकाम कामगारांच्या जिल्हा बैठकीत बाबल नांदोस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काशिराम वाईरकर, दीपक गावडे, एकनाथ सावंत, राजाराम मातोंडकर, शशिकांत कदम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देबांधकाम कल्याणकारी संघाचे प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबितकामगारांचा २६ ला तातडीचा मेळावा : बाबल नांदोस्कर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाला कायमस्वरूपी कामगार अधिकारी मिळावा तसेच शासन दरबारी जे न्याय्य प्रश्न आहेत त्यासाठी येत्या शुक्रवारी २६ फेब्रुवारीला तातडीचा कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कल्याणकारी संघाचे अनेक प्रश्‍न शासनदरबारी प्रलंबित असल्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने मंगळवारी कार्यकारिणी सदस्यांची नियोजनाची बैठक जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांच्या अध्यक्षेखाली श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृह येथे पार पडली.

यावेळी काशिराम वाईरकर, दीपक गावडे, एकनाथ सावंत, राजाराम मातोंडकर, शशिकांत कदम, अशोक बोवलेकर, विनायक मेस्त्री, प्रज्ञा सावंत तुळशीदास पवार, निकिता गावकर, सचिन नेरुरकर, संतोष चव्हाण, महादेव वरावडेकर आदी उपस्थित होते.

नांदोस्कर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार बांधकाम कामगार आहेत पण त्यांचे गेले कित्येक वर्षांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात महत्वाचे प्रश्न मार्गी लागले होते. गेले काही महिने कोरोना महामारी संकटामुळे कामगार कल्याणकारी कर्मचाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

बांधकाम कल्याणकारी संघाचा संबंधित अधिकारी हा प्रभारी असल्यामुळे अनेक प्रश्न हे शासन दरबारी पडून आहेत. कामगार अधिकारी कुबल हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी म्हणून रायगडचे कोल्हटकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आले आहे. मात्र कोल्हटकर हे महिन्यातून दोन दिवस जिल्ह्यात येत असल्यामुळे आम्हा सर्व बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.

कामगारांच्या नोंदणीबाबत ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे या सिस्टिममुळे प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कायमस्वरूपी बांधकाम कामगार कल्याण अधिकारी मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

वेळप्रसंगी न्याय्य मागण्यासाठी प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास बांधकाम कामगारांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. गेल्या दहा अकरा महिने कोरोना महामारी संकट असल्यामुळे आम्हा सर्व कामगाराना आर्थिक संकटातून वाटचाल करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २६ फेब्रुवारीला कोरोना नियमांच्या अधीन राहून रवळनाथ मंदिर नजीकच्या सभागृहात बांधकाम कामगार कल्याणकारी संघ पदाधिकारी व कामगार यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात बांधकाम कामगार याबाबत पुढील निर्णय घेणार आहेत. यावेळी प्रश्न न सुटल्यास त्याच वेळी आंदोलनाच्या पावित्र्यात आम्ही असणार असल्याचे यावेळी नांदोस्कर यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Question of Construction Welfare Association pending in Government Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.