corona virus : चाकरमान्यांची गर्दी, खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:47 IST2020-07-27T15:41:25+5:302020-07-27T15:47:58+5:30
मुंबईकर चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला काही दिवस अगोदरच गावी येत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची गर्दी वाढली होती.

खारेपाटण तपासणी नाका येथे मुंबई येथून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
खारेपाटण : काही दिवसांवर येऊन ठेपलेला गौरी-गणपती सण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत असलेले कडक निर्णय यामुळे मुंबईकर चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला काही दिवस अगोदरच गावी येत आहेत. त्यामुळे खारेपाटण तपासणी नाक्यावर पुन्हा एकदा वाहनांची व चाकरमान्यांची गर्दी वाढली होती.
सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाका म्हणजेच खारेपाटण तपासणी नाक्यावर रविवारी सकाळपासूनच मुंबईवरून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढू लागली. यामुळे येथे कार्यरत असलेल्या महसूल नोंदणी पथकासमोर मुंबईकर चाकरमान्यांची नोंदणी करण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. येथे लहान-मोठी खासगी वाहने एका बाजूला रांगेत उभी करून ठेवण्यात आली होती.
खारेपाटण तपासणी नाका येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस नाईक संजय चव्हाण, पोलीस शिपाई राजाराम पाटील, अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, चौधरी, वाहतूक पोलीस शिपाई गायतोंडे, पोलीस हवालदार तारी, खारेपाटण पोलीस हवालदार अनमोल रावराणे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस शिपाई सुयोग पोकळे आदी पोलीस यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले.