अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : विश्वजितराजे नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 15:59 IST2021-12-08T15:58:20+5:302021-12-08T15:59:08+5:30
तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : विश्वजितराजे नाईक-निंबाळकर
फलटण : फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. आगामी काळात सर्वसामान्य शेतकरी, शेतकऱ्यांचे पाल्य व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याबाबतीत कसलीही तक्रार आली तरी त्यावर कडक पावले उचलण्यात येतील. आपल्या कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,’ असा सज्जड दम पंचायत समितीचे नूतन सभापती विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहावे. तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध राहणार आहे, असेही विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यामधील बहुतांश ग्रामसेवक हे नियुक्तीच्या ठिकाणी बसत नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये सांगतात की, ‘अण्णासाहेब फलटणला गेले आहेत. वास्तविक ते फलटणलासुद्धा कामासाठी आलेले नसतात. आगामी काळात अशा प्रकारे जर कोणी ग्रामसेवक कामकाज करीत असतील, तर त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी नूतन उपसभापती संजय सोडमिसे, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, रेश्मा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घ्या...
सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. त्या योजना संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वितरण करण्यात येणार आहे. ज्यांना आगामी योजनेचा लाभ घ्यायचा आहे; परंतु त्यांना प्रक्रिया माहीत नाही त्यांनासुद्धा त्यांच्या गावामध्ये येऊनच मार्गदर्शन करण्यात येणार आहे.