The new vegetable will be kept in Mirajat | मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार
मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार

ठळक मुद्देमिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणारआयुक्तांनी दिल्या काम थांबविण्याच्या सूचना

मिरज : मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी रेवणी मार्केट परिसराजवळ असलेल्या किल्ल्याच्या खंदकाच्या जागेत भाजी मंडईच्या कामाचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आले. शासनाने भाजी मंडईसाठी १३ कोटी रुपये निधी महापालिकेस दिला आहे. भाजी मंडईचा आराखडा तयार करून व तांत्रिक व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून निविदा मागविण्यात आल्या. निविदा निश्चित करून ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

ठेकेदाराने खंदकातील पाण्याचा मोटारी लावून उपसा सुरु केला. मात्र काम सुरू झाल्यानंतर प्रस्तावित आराखड्यानुसार भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने बांधकाम परवानगी देणे अशक्य असल्याचा पवित्रा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी आवश्यक रूंदीचा रस्ता दोन्ही बाजंूनी उपलब्ध झाल्यानंतर बांधकाम परवानगी मिळणार आहे.

बांधकाम परवानगीशिवाय भाजी मंडई उभारणी अशक्य असल्याने भाजी मंडईसाठी खंदकाच्या काठावरील रस्त्यासाठी जागेचे संपादन करावे लागणार आहे. महापालिकेने किल्ल्याभोवती असलेल्या खंदाकाची सुमारे पाच एकर जागा भाजी मंडईसाठी आरक्षित केली आहे. मात्र खंदकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या खासगी मिळकतीतून रस्त्यासाठी जागा मिळविणे आवश्यक आहे.

रस्त्यासाठी खंदकातील भाजी मंडईचे काम थांबल्यास मार्केट परिसरात पर्यायी जागा शोधण्याची मोहीम पुन्हा सुरु केल्यास भाजी बाजार पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. किल्ल्यातील खंदकात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने येथे भाजी मंडई बांधली तरी, वारंवार खंदकातील पाणी उपसा करावा लागणार आहे. अन्यथा पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

भाजी मंडईसाठी दोन्ही बाजूस रुंद रस्ते करून देण्यासाठी अतिक्रमणे काढून काही मालमत्ता धारकांना जागेचा मोबदला देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. भाजी मंडईसाठी रस्त्यांची व्यवस्था न करताच काम सुरू केल्याने १३ कोटींची सुसज्ज अशी भाजी मंडईची उभारणी अडचणीत आली आहे.

भाजी मंडईसाठी जागेचा शोध गेली अनेक वर्षे सुरु आहे. कमान वेस परिसरात ३ एकर जागेचा पर्याय मनपा प्रशासनापुढे आहे. येथे भाजी मंडईसाठी विक्रेते तयार नसल्याने खंदकातील भाजी मंडईचे काम सुरु न झाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे.

मिरजेतील भाजी मंडईबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम परवाना नसताना काम सुरू करण्याचे आदेश काढून महापालिका प्रशासनाच्या घाईमुळे भाजी मंडई उभारणी अडचणीत आल्याचे चित्र आहे.

Web Title: The new vegetable will be kept in Mirajat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.