Corona Virus Lockdown: 5,000 liters of Shirkhurma in Miraj | CoronaVirus Lockdown : मिरजेत तब्बल ५ हजार लिटर शिरखुर्मा, गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी ईदचीभेट

CoronaVirus Lockdown : मिरजेत तब्बल ५ हजार लिटर शिरखुर्मा, गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी ईदचीभेट

ठळक मुद्देमिरजेत तब्बल ५ हजार लिटर शिरखुर्मासाडेतीन हजार लिटर दूध, ५०० किलो साखर, ८० किलो तुपाचा वापर

सांगली : पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झालेल्या मुस्लिम कुटुंबांसाठी ईदची ही अनोखी भेट ठरली.

शकिल पिरजादे अणि त्यांच्या सहकार्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला. लॉकडाऊन काळात जेवणाची भ्रांत असणार्या कुटुंबांचे त्यांनी सर्वेक्षण केले. अशी गरीब व गरजू ३ हजार ७८५ कुटुंबे निघाली. त्यांच्यासाठी गेल्या ६३ दिवसांपासून दररोज जेवणाचा घरोघरी जाऊन पुरवठा केला जात आहे.

आजवर ११ हजार ८०० किलो तांदूळ बिर्याणीसाठी वापरला गेला. रमजान ईदचा सणही लॉकडाऊन काळातच आल्याने या कुटुंबांसाठीशिरखुर्मा तयार करण्याचा संकल्प फाऊंडेशनने केला. त्यासाठी लागणारे साहित्यही तितकेच अवाढव्य असे होते. साडेतीन हजार लिटर दूध, ५०० किलो साखर, ८० किलो तूप, १२५ किलो सुकामेवा, १५० किलो शेवया अशी सामग्री वापरली गेली.

शास्त्री चौकातील फातीमा मस्जिदीच्या प्रांगणात रात्रभर कार्यकर्त्यांनी खीर शिजविली. पहाटे पाचचा नमाज होईपर्यंत ती तयारही झाली. सकाळी डबे भरण्याचे काम सुरु झाले. अकरा-बारापर्यंत हजारभर घरांत ती पोहोचलीदेखील. प्रत्येक घरात दोन डबे देण्यात आले. या उपक्रमात पिरजादे यांच्यासह अमीन जातकार, शमशुद्दीन शेख, नईम सलाती आदींनी भाग घेतला.
 

Web Title: Corona Virus Lockdown: 5,000 liters of Shirkhurma in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.