BJP increases unemployment in country: Siddaramaiah | Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्या

ठळक मुद्देभाजपमुळे देशातील बेरोजगारीत वाढ : सिद्धरामय्यापृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा

सांगली : मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली.

सांगली मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, आ. रामहरी रुपनवर, माजी महापौर हारुण शिकलगार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, मनगू सरगर उपस्थित होते. काठी व घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाठग, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटे ठग आहेत. भाजप हा अल्पसंख्याक व दीन-दलितांचा पक्ष नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कधीही सामाजिक न्याय मिळणार नाही. इतर धर्मांची पायमल्ली सरकारने केली आहे. भाजपचे नेते सतत दुसऱ्या धर्मांबद्दल अनादराची भावना प्रदर्शित करीत आहेत. सर्वांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या मंडल आयोगाला त्यांनी विरोध केला होता. सत्तेवर आल्यानंतरही त्यांचे तेच धोरण कायम आहे. संविधानाबद्दल प्रेम नसलेल्या भाजप-सेनेकडून सामान्यांना न्याय मिळणार नाही.

भाजपकडून आजपर्यंत शून्य विकास झालेला आहे. केवळ मुखी विकास आणि कृती काहीच नाही. आम्ही घटना बदलण्यासाठी निवडून आलोय,असे ते ठामपणे सांगत आहेत. हिंदू महासभा, बजरंग दलाचे लोक घटनेविरोधात आहेत. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर येताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. अद्याप हा समाज आरक्षणापासून वंचितच राहिला आहे. धनगर समाजाने भाजपला मतदान करू नये.

Web Title: BJP increases unemployment in country: Siddaramaiah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.