Join us

Health Tips : पावसाळ्यात साथीच्या आजारांना चार हात लांब ठेवण्यासाठी वेळीच 'असा' घ्या आहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:03 IST

Health Tips : पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे.

पावसाळ्यात लोकांना संसर्ग होण्याचा अतिरिक्त धोका वाढतो. अशा स्थितीत आरोग्याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर  समस्या वाढू शकते. कोरोना व्हायरसनं गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलंय. पावासाळा आला की सगळ्यांनाच सर्दी, खोकल्याचा त्रास होतो.  खाण्यापिण्याच्या सवयीं, वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर साथीच्या आजारांपासून  बचाव करता  येऊ शकतो. डॉ. बेहराम पारडीवाला ( इंटर्नल मेडिसिन, वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) यांनी पावसाळ्यात साथीच्या  आजारांपासून बचावासाठी आहार कसा असावा, रोजच्या सवयींमध्ये कोणता बदल  करावा  याबाबत माहित दिली आहे. 

हायड्रेटेड रहा

कोणत्याही ऋतूत शरीराला हायड्रेट  ठेवण्याची गरज असते म्हणून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास  आजारांचा सामना करावा लागू शकतो. शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात उकळलेलं पाणी प्या.   स्वच्छता

पावसाळ्याच्या दिवसात योग्य स्वच्छता ठेवली गेली तर अनेक आजार पसरतात म्हणून वेळीच खबरदारी घेणं फायद्याचं ठरतं. वॉशरूमचा वापर करून झाल्यानंतर  हात स्वच्छ धुवा, नखं जास्त वाढू देऊ नका, अंगावरच्या जखमांना वारंवार स्पर्श करू नका, जेवण बनवण्याआधी, नंतर हात चांगले स्वच्छ करा, दात घासताना जीभही स्वच्छ करा. अंघोळीच्या पाण्यात  एंटी-बॅक्टेरिअल लिक्विड घातल्यास उत्तम ठरेल. याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

योग्य आहार

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. फळे आणि भाज्या शिजवण्यापूर्वी व्यवस्थित धुवा आणि कच्चे पदार्थ खाणे टाळा. पावसाळ्यात थंड वातावरण असल्याने थंड पेय, थंड पदार्थ देखील खाऊ नयेत, मोड आलेली कडधान्ये कच्ची न खाता शिजवून खाण्यालाच प्राधान्य द्यावे.  जास्त पिकलेली फळं खाऊ नयेत. धुवून स्वच्छ करून मगच  खावीत.

काही उपयोगी टिप्स 

पावसात भिजणं टाळा

पाणी उकळल्याशिवाय पिऊ नका

व्यायामासाठी वेळ काढा

दिवसातून दोनदा स्टीम घ्या

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा

घरात पाणी जमा होऊ देऊ नका.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सपाऊसतज्ज्ञांचा सल्ला