lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आहे हिंमत, मग उचला हा विडा आणि वाढवा आपलं कॅल्शिअम!

आहे हिंमत, मग उचला हा विडा आणि वाढवा आपलं कॅल्शिअम!

विड्याच्या पानात कॅल्शिअम असतं, हे माहिती आहेच, पण त्याचे उत्तम पदार्थ होतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 10:26 PM2021-03-22T22:26:32+5:302021-03-22T22:34:08+5:30

विड्याच्या पानात कॅल्शिअम असतं, हे माहिती आहेच, पण त्याचे उत्तम पदार्थ होतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?

betel leaves great source of calcium | आहे हिंमत, मग उचला हा विडा आणि वाढवा आपलं कॅल्शिअम!

आहे हिंमत, मग उचला हा विडा आणि वाढवा आपलं कॅल्शिअम!

Highlightsमात्र एक धोका आहेच, सारखं पान चघळण्याची सवय मात्र वाईट. त्यानं गालाचा आणि जिभेचा कर्करोग होऊ शकतो.

वर्षा जोशी


मस्त जेवण झाल्यावर सर्वाना विडा खावासा वाटतो. विड्यानं जेवणाची सांगता होते. पण एवढंच विड्याचं स्थान आणि महत्त्व नाही. विडा उचलणं हे काही सोपं काम नव्हतं इतिहासातही.
आपल्या संस्कृतीत विडय़ाच्या पानाला फार महत्व आहे. पूजेसाठी लागणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी योग्य असतात. त्याप्रमाणे विडय़ाच्या पानातही औषधी गुणधर्म आहेत. कोणत्याही पूजेच्या आरंभी घरातल्या देवांची पूजा करुन दोन विडय़ाच्या पानांवर सुपारी ठेवून त्यांची प्रार्थना केली जाते. कोणत्याही कार्यात तांदुळ पसरुन किंवा विडय़ाच्या पानांवर सुपारी ठेवून तिला श्री गणोश मानून प्रथम पूजा केली जाते आणि मगच ते कार्य सुरु होतं. जुन्या काळी लग्ना मुंजीसारख्या कार्यामधे स्वागत समारंभात पानसुपारीसाठी आमंत्रण दिलं जात असे. दक्षिणा देतांना विडय़ाचं पान आणि सुपारीसह दिली जाते.
असं काय असतं विड्यात आणि नव्या डाएटच्या काळात विडा आपल्याला पचेल का?


विडय़ाच्या पानांमध्ये 85.4 टक्के आद्र्रता, 3.9 टक्के प्रथिने, 6.1 टक्के काबरेहायड्रेटस, 2.3 टक्के चोथा, 8 टक्के स्निग्ध पदार्थ आणि 2.3 टक्के खनिजं असतात. खनिजांमध्ये जास्त करून कॅल्शिअम असतं. या शिवाय ब आणि क जीवनसत्वं असतात. हल्लीच्या संशोधनानुसार पानांमधे टॅनिन, साखर, इस्सोन्शिअल ऑइल वगैरे गोष्टीही असतात. हे तेल फिक्या पिवळ्या रंगाचं आणि विशिष्ट वासाचं असतं. त्यामधे असलेल्या फीनॉलमुळे त्याला सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म प्राप्त होतात, पानांमधील काही रसायनांमुळे कॉफी प्याल्यानंतर येते तशी तरतरी पान खाल्ल्यामुळेही येते. विडय़ाच्या पानात यूूजीनॉल हे रसायन असतं.
आपल्याकडे स्वयंपाकात आपण विडय़ाच्या पानांचा फारसा वापर करीत नाही. पण लोणी कढवतांना साजुक तुपाला उत्तम कणी पडण्यासाठी लोण्यात एक विडय़ाचं पान टाकलं जातं. लोणी काढत असताना विडय़ाच्या पानातलं कॅल्शिअम त्यात उतरत असावं. तूप तयार झालं की हे कॅल्शिअमचे रेणू सीड म्हणून वागत असणार आणि त्याभोवती तुपाचे रेणू जमून तुपाच्या कणांची वाढ होऊन तूप रवाळ होत असणार म्हणजेच त्याला कणी पडत असणार असं विज्ञानाचा विचार केला तर वाटतं.


थाई जेवणात विड्याच्या पानाचे पदार्थ


थायलंडमधे विड्याच्या पानांचा उपयोग पाककृतीमधे करतात. या पानांमधे दाणे, तिसऱ्या, आलं, लिंबू एकत्र करुन सारण तयार करुन ते भरतात आणि अशी भरलेली पानं स्नॅक्स म्हणून विकली जातात. पानांमध्ये कधीकधी खिमाही भरला जातो. सॅलडमधे ही पानं वापरली जातात. त्याप्रमाणे पदार्थ सजविण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.
विडय़ाच्या पानांच्या वेलीला म्हणजे नागवेलीला पांढरी फुलं येतात. त्यांचं रूपांतर हिरव्या तपकिरी छोटय़ा फळांमधे होतं. या फळांमधल्या गराचा उपयोगही तिथे खाण्यासाठी केला जातो.


विडा आणि कॅल्शिअम


विडय़ाच्या पानांमधे खूप औषधी गुणधर्म आहेत. नर्व्हजचा कमकुवतपणा, डोकेदुखी, श्वासाच्या त्रासावर विडय़ाचं पान औषध म्हणून वापरतात.
सांध्याची सूज कमी करण्यासाठी त्यांचा लेप देतात.
पानांचा रस, थोडा आल्याचा रस आणि मध एकत्र करुन ते चाटण खोकल्यावर औषध म्हणून वापरलं जातं.
थायलंड आणि चीनमधे वेलीची मुळं कुटूंन त्यात मीठ घालूृन ते मिश्रण दातदुखीवर वापरलं जातं.
मात्र एक धोका आहेच, सारखं पान चघळण्याची सवय मात्र वाईट. त्यानं गालाचा आणि जिभेचा कर्करोग होऊ शकतो.

(लेखिका भौतिकशास्त्रमध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिन विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Web Title: betel leaves great source of calcium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.