प्रत्येकीच्या कपाटात असायलाच हव्यात ८ सदाबहार कॉटनच्या साड्या! साध्या कॉटन साडीतही मिळेल 'रॉयल लूक'...
Updated:January 26, 2026 16:53 IST2026-01-25T10:45:00+5:302026-01-26T16:53:23+5:30
evergreen 8 types of cotton sarees : cotton sarees collection : types of cotton sarees : different cotton saree varieties : कॉटन साड्यांचे ७ प्रकार, जे तुम्हाला देतील आरामदायी आणि सुंदर लूक...

साडी नेसणं ही एक कला आहे आणि त्यातही जर कॉटनची साडी असेल, तर सोन्याहून पिवळं! साडी नेसायची म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती म्हणजे मऊ आणि सुटसुटीत कॉटनची साडी... परंतु कॉटन म्हणजे फक्त साधी सुती साडी नाही. आजच्या फॅशनच्या युगात कॉटनमध्ये असे अनेक प्रकार आले आहेत, जे तुम्हाला प्रोफेशनल लूकसोबतच एखाद्या सोहळ्यासाठी लागणारा रॉयल लूकही देतात(evergreen 8 types of cotton sarees).
कॉटनच्या साड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बदलत्या फॅशननुसार साड्यांचे (different cotton saree varieties) अनेक प्रकार बाजारात आले आणि गेले, पण कॉटनचा दर्जा आणि त्याचा रुबाब आजही टिकून आहे.
अनेक महिलांना कॉटनच्या साड्या नेसण्याची आवड असते, पण त्या फुगतात किंवा (cotton sarees collection) त्याचं मेंटेनन्स कठीण असतं म्हणून त्या टाळल्या जातात. मात्र, योग्य प्रकारची निवड केली तर कॉटन साडीसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. ऑफिस वेअरपासून ते सण-समारंभांपर्यंत फिट बसणारे कॉटनचे अनेक प्रकार सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत.
कॉटनच्या साड्यांचे असे काही प्रकार पाहूयात की, ज्या केवळ वजनाला हलक्याच नाहीत, तर त्या तुम्हाला एक अतिशय 'रुबाबदार' आणि 'स्टायलिश' लूक मिळवून देतील.
१. खादी कॉटन साडी :-
खादी कॉटन साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कापड उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते आणि हिवाळ्यात ऊब देते. आजकल खादी साड्यांवर ब्लॉक प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, आणि काठ-पदर (Zari Borders) वापरून त्यांना आधुनिक लूक दिला जातो. त्यामुळे या साड्या केवळ ऑफिससाठीच नाही, तर सण-समारंभांतही उठून दिसतात. खादी कॉटन साडीवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Silver Jewellery) किंवा लाकडी मण्यांच्या माळा अतिशय सुंदर दिसतात. एक कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज आणि कपाळावर छोटी टिकली तुमचा लूक पूर्ण करेल.
२. चंदेरी सिल्क कॉटन साडी :-
पूर्वी ही साडी केवळ राजघराण्यातील स्त्रियांच्या पसंतीस उतरायची, म्हणूनच आजही याला 'क्वीन्स फॅब्रिक' मानले जाते. चंदेरी साडी ही सिल्क (रेशीम) आणि कॉटन (सूती) अशा दोन्ही सुतांच्या मिश्रणातून तयार केली जाते. यामुळे या साडीला रेशमी चमकही मिळते आणि सुती कापडाचा मऊपणा व आरामही मिळतो. ही साडी दिसायला पारदर्शक आणि अतिशय तलम असते. चंदेरी साड्यांवरील सोन्या-चांदीच्या जरकाम केलेल्या बुट्ट्या प्रसिद्ध आहेत. यात प्रामुख्याने नाणी फुले, मोर आणि भौमितिक आकृत्यांची सुंदर नक्षी असते. याचे काठ अतिशय नाजूक आणि उठावदार असतात. चंदेरी सिल्क कॉटन साडीवर मोत्यांचे दागिने अतिशय मोहक दिसतात. साडीच्या नक्षीनुसार तुम्ही सोनेरी झुमके किंवा चोकर नेकलेस घालून तुमचा लूक अधिक खुलवू शकता. सिल्क असूनही ही साडी वजनाला अत्यंत हलकी असते, त्यामुळे ती दिवसभर सहजपणे नेसली जाऊ शकते.
३. इकत कॉटन साडी :-
इकत कॉटन साडी ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण 'टाय आणि डाय' (Tie & Dye) विणकामामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. कापड विणण्यापूर्वीच सुताला ठराविक अंतरावर बांधले जाते आणि मग रंगवले जाते. यामुळे साडीवर अतिशय सुंदर आणि 'धूसर' कडा असलेल्या डिझाइन्स तयार होतात, ज्याला 'इकत' म्हटले जाते. इकत साड्यांमध्ये सहसा भौमितिक आकृत्या, पट्टे आणि चौकटी पाहायला मिळतात. इकत साडी ही स्वतःच एक मोठी कलाकृती असल्याने यावर कमी दागिने घातले तरी चालते. ब्लॅक मेटल किंवा लाकडी दागिन्यांसह ही साडी अतिशय उठून दिसते. जर साडीवर डार्क रंगाची डिझाईन असेल, तर कॉन्ट्रास्ट रंगाचा प्लेन ब्लाउज घालून तुम्ही तुमचा लूक हायलाईट करू शकता.
४. जामदानी कॉटन साडी :-
जामदानी हा शब्द मूळचा पर्शियन आहे, जिथे 'जाम' म्हणजे फूल आणि 'दानी' म्हणजे कुंडी. या साडीच्या नावाप्रमाणेच यावर फुलांची आणि वेलींची अत्यंत नाजूक नक्षी हाताने विणलेली असते. ही साडी दिसायला पारदर्शक, हवेसारखी हलकी आणि नेसल्यानंतर अतिशय आरामदायी असते. जामदानीवर प्रामुख्याने 'बुट्टी' किंवा 'जाल' वर्क असते. यात पाने, फुले, मोर अशा मोहक डिझाइन्स असतात. पारंपारिक पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाव्यतिरिक्त आता ही साडी सर्व आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. जामदानी साडी अतिशय नाजूक असल्याने यावर पारंपारिक दागिने खूप छान दिसतात. उदाहरणार्थ, गळ्यात सोन्याची चिंचपेटी किंवा मोत्यांची माळ आणि हातात नाजूक बांगड्या घातल्यास तुमचा लूक अतिशय राजेशाही वाटेल. केस बांधून त्यावर गजरा लावल्यास या साडीचे सौंदर्य अधिकच खुलते.
५. मलमल कॉटन साडी :-
मलमल साड्यांवर सहसा फ्लोरल प्रिंट्स, ब्लॉक प्रिंट्स किंवा चिकनकारी एम्ब्रॉयडरी पाहायला मिळते. सध्या पेस्टल रंगांमधील (उदा. बेबी पिंक, मिंट ग्रीन, लेमन येलो) मलमल साड्यांना मोठी मागणी आहे. मलमल साडी दिसायला अतिशय साधी असते, पण तिचा लूक खूप प्रीमियम आणि 'एलिगंट' वाटतो. मलमल साडीवर चांदीचे झुमके आणि हातात एखादी मोठी अंगठी खूप स्टायलिश दिसते. या साडीचा पदर मोकळा सोडल्यास तिचा तलमपणा आणि सौंदर्य अधिक खुलून दिसते.
६. प्रिंटेड कॉटन साडी :-
प्रिंटेड कॉटन साडी ही साडी केवळ आरामदायीच नाही, तर रंगांच्या आणि नक्षीच्या वैविध्यामुळे ती नेहमीच फॅशनमध्ये असते. साध्या घरगुती वापरापासून ते कॉर्पोरेट ऑफिस मीटिंगपर्यंत ही साडी महिलांची पहिली पसंती असते. इतर विणलेल्या साड्यांच्या तुलनेत प्रिंटेड कॉटन साड्या किमतीने कमी असतात, पण दिसायला त्या अत्यंत महागड्या साड्यांसारखा लूक देऊ शकतात. प्रिंटेड साडीवर नेहमी 'प्लेन' किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज वापरावा, ज्यामुळे साडीची प्रिंट उठून दिसते. जर साडीवर मोठी प्रिंट असेल, तर दागिने छोटे ठेवावेत आणि जर साडीची प्रिंट छोटी असेल, तर मोठे स्टेमेंट इअररिंग्स किंवा नेकलेस घालून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करू शकता.
७. बंगाल कॉटन साडी :-
बंगाल कॉटन साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या अत्यंत पातळ आणि तलम धाग्यांपासून विणल्या जातात. या साड्यांचे काठ थोडे जाड आणि उठावदार असतात. काठांवर रेशमी धाग्यांनी किंवा जरीने फुले, मोर, मासे किंवा भौमितिक आकृत्या विणलेल्या असतात. या साडीचा पदर खूपच कलाकुसर केलेला असतो. बंगाल कॉटन साडीवर मोठं लाल कुंकू किंवा टिकली आणि हातात काचेच्या बांगड्या घातल्यास एक परिपूर्ण बंगाली लूक मिळतो. यावर सोन्याचे पारंपारिक दागिने किंवा टेराकोटा दागिने अतिशय उठावदार दिसतात.
८. महेश्वरी कॉटन साडी :-
महेश्वरी साड्या या प्रामुख्याने सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून विणल्या जातात. यामुळे साडीला एक नैसर्गिक चमक मिळते आणि ती वजनाला अत्यंत हलकी असते. या साड्यांचा पोत अत्यंत मऊ असतो. सुरुवातीला या साड्या केवळ नैसर्गिक रंगात असायच्या (उदा. जांभळा, मरून, हिरवा). मात्र, आता फॅशननुसार पेस्टल आणि ब्राइट रंगांमध्येही या साड्या उपलब्ध आहेत. यातील 'जरतारी' काठ साडीचा लूक अधिक खुलवतात. महेश्वरी साडीवर सोन्याचे पारंपारिक दागिने किंवा नाजूक टेंपल ज्वेलरी अतिशय सुंदर दिसते. साडीच्या बॉर्डरला साजेसा एखादा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि केस बांधून घातलेला गजरा तुमचा 'राजेशाही लूक' पूर्ण करेल.