lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

परीक्षेच्या काळात मुलांचा गाण्याचा, चित्रकलेचा क्लास बंद केला, खेळू दिलं नाही तर खरंच मुलांचा अभ्यास जास्त होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 05:33 PM2024-03-26T17:33:45+5:302024-03-26T17:38:43+5:30

परीक्षेच्या काळात मुलांचा गाण्याचा, चित्रकलेचा क्लास बंद केला, खेळू दिलं नाही तर खरंच मुलांचा अभ्यास जास्त होतो?

no sport in exams, no hobby, why parents keep children away from game? | परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

परीक्षा आहे, अभ्यास कर -खेळायला जायचं नाही! पालक मुलांना घरात कोंडतात, त्याने मार्क वाढतात?

Highlightsखरं तर परीक्षेच्या काळातही खेळ आणि अभ्यास यांचं योग्य टाईमटेबल तयार करणं जास्त चांगलं.

– डॉ. श्रुती पानसे

परीक्षा जवळ आली की मुलांचा खेळ बंद होतो. इतर कोणते नृत्यासारखे क्लास असतील, मित्र-मैत्रिणींशी गप्पा, खेळ हे ही बंद होतात. एखाद्याला खेळायचं असलं तरी खेळगडी नसतात. असं चित्र घरोघरी, सगळीकडे दिसतं. याचं मुख्य कारण असं असतं की आता बाकी गोष्टींवर ‘वेळ वाया न घालवता ’ फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावं. इतर सगळ्या गोष्टी बंद केल्या की आपोआप अभ्यासावरची एकाग्रता वाढेल आणि वाचलेलं – लिहिलेलं नीट लक्षात राहील असं पालकांना वाटतं. 
जर वर्षभर अभ्यास केलेला असेल आणि आधीच्या सर्व चाचण्यांना पुरेसे मार्क मिळाले असतील तर केवळ वार्षिक परीक्षेसाठी नेहमीचं रूटीन बदलण्याचा फारसा फायदा होत नाही. पण अगदी ९४ % मिळाले आहेत. थोडा अजून अभ्यास केला तर ९७ मिळतील अशी जीवघेणी स्पर्धा असेल तिथे अनेकदा आईबाबा जास्तीच्या थोड्या थोड्या टक्क्यांची अपेक्षा करतात.
जिथे वर्षभर अभ्यास झालेलाच नाही, हे आईबाबा आणि मुलांनाही माहीत असतं तेव्हा खेळ आणि इतर छंद बंद होण्याकडेच कल असतो. वर्षभर केला नाही अभ्यास आता शेवटच्या महिन्याभरात तरी कर, म्हणून बाकी सगळं बंद करावं लागतं.

(Image :google) 

याचा परिणाम नक्की काय होतो?

१. आपल्या शरीरात एक नैसर्गिक घडयाळ असतं. ज्यामुळे आपण वेळच्या वेळी जागे होतो, वेळच्या वेळी झोपतो, ठराविक वेळेला उत्साही असतो, तसंच ठराविक वेळेला दमतो. आपण रोज मैदानावर जाऊन खेळत असू तर त्या खेळाची शरीराला – शरीरातल्या या घड्याळाला सवय झालेली असते. खेळताना किंवा नृत्य करताना शरीराच्या हालचालीतून उपकारक अशी रसायनं निर्माण होत असतात. खेळातून आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होत असते, दमलं तरी उत्साही वाटत असतं.
२. अचानक खेळणं बंद होतं तेव्हा ही रसायनं निर्माण होण्याचं थांबून जातं. परिणामी योग्य ती ऊर्जा मिळत नाही. त्यातून अभ्यासासाठी एका जागी बसणं वाढतं. हालचाली थांबतात. आळस वाढतो तर दुसरीकडे चिडचिडही वाढते. मन एकाग्र व्हायला वेळ लागतो. म्हणून मुलं सारखी अभ्यासातून उठतात. जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
३. केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी, तो योग्य क्रमाने आठवण्यासाठी सुद्धा मेंदूला ऊर्जा हवी असते. ती अचानक मिळेनाशी होते. म्हणून कोणतीही गोष्ट अचानक बंद करू नये, तशी अचानक पहिल्याच दिवशी खूप ताण देऊन करू नये, हळू हळू सुरू करावी तशीच हळू हळू बंद करावी.
४. खरं तर परीक्षेच्या काळातही खेळ आणि अभ्यास यांचं योग्य टाईमटेबल तयार करणं जास्त चांगलं.

(संचालक, अक्रोड)
ishruti2@gmail.com

Web Title: no sport in exams, no hobby, why parents keep children away from game?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.