शाळा म्हटलं की मजा, मस्ती आणि मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या बेंचवर बसण्याची धडपड आलीच. कोणत्या बेंचवर बसायचं हे विद्यार्थ्यांचं आधीच ठरलेलं असतं. हुशार मुलं विशेषत: शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात आणि बॅक बेंचर मुलं म्हणजे मठ्ठ, ढ अशी विशेषणं लागतात. ज्या मुलांना मस्ती करायची असते, शिक्षणात फारसा रस नसतो ती मुलं मागे बसतात असं म्हटलं जातं. पण आता या विचारसरणीला छेद देणारी एक हटके कल्पना समोर आली आहे. केरळमधीलशाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली आहे.
शाळांनी Sthanarthi Sreekuttan या चित्रपटापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये शाळेतील मुलं बॅक बेंचर नसतील अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था इतकी उत्तम आहे की प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आरामात पोहोचता येतं, सर्व विद्यार्थ्यांना सहज पाहता येतं आणि विद्यार्थी देखील त्यांच्या शिक्षकांना सहजपणे पाहू शकतात.
चित्रपटात प्राथमिक शाळेतील विद्यार्थी श्रीकुट्टन वर्गात बसण्याचं एक मॉडेल सादर करतो जे त्याच्या मनातील 'बॅकबेंचर' असल्याचा कलंक दूर करेल. यू-आकाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे हे मॉडेल सर्वप्रथम पडद्यावर दिसलं. त्यानंतर आता यापासून प्रेरणा घेऊन केरळच्या शाळांमध्येही आलं आहे. "ही एक साधी कल्पना होती जी आमच्या मनात आली होती, आम्हाला वाटलं नव्हतं की शाळांमध्ये हा एक ट्रेंड बनेल" असं चित्रपटाचा दिग्दर्शक विनेशने म्हटलं आहे.
"आम्ही चित्रपटासाठी संशोधन करत असताना, आम्हाला आढळलं की, काही शाळांमध्ये ही व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने ते सर्वत्र लागू नाही. आतापर्यंत फक्त काही शाळांनीच ही व्यवस्था स्वीकारली आहे आणि कन्नूरमधील शाळांमध्ये ही व्यवस्था लागू करण्यासाठी मोहीम सुरू केली जाईल असं आम्ही ऐकलं आहे" असंही विनेश यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे शाळेतील या व्यवस्थेत कोणत्याही विद्यार्थ्याला एकटं पडल्यासारखं किंवा दुर्लक्षित असल्यासारखं वाटण्याची शक्यता जवळजवळ अशक्य आहे आणि शिक्षक देखील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेऊ शकतील, कारण कोणताही विद्यार्थी मागे लपून राहणार नाही. शिकवताना शिक्षकांना सर्वच विद्यार्थ्यांकडे पाहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल.
कोल्लम जिल्ह्यातील वालकोम येथे असलेल्या रामविलासोम वोकेशनल हायर सेकेंडरी स्कूलने एक वर्षापूर्वी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांसाठी ही बसण्याची व्यवस्था स्वीकारली. हे खूप फायदेशीर ठरलं आहे. आता शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभा राहतो आणि प्रत्येक मुलाचं लक्ष वेधून घेतो" असं शाळेचे मुख्याध्यापक सुनील पी. शेखर यांनी म्हटलं आहे.