मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, म्हणजे ते आळशी आहेत किंवा टाळाटाळ करतात. बरोबर ना? पालकांचा हाच तर्क असतो. अनेकदा तो खराही असू शकतो. मात्र बरेचदा मुलांना आपण गृहीत धरतो. अनेक वेळा मुले अभ्यास करु न शकण्यामागील कारणे खूप खोल असू शकतात. (Don't say that children are deliberately disruptive and annoying, see 5 reasons why children don't study or listen)मुलांच्या मनात, त्यांच्या शरीरात किंवा दैनंदिन वातावरणात काहीतरी घडत असते आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या अभ्यासावर दिसतो. त्यामुळे मुलांचे लक्ष एकाग्र होत नसेल, तर प्रथम त्यांच्या पाठीमागची खरी कारणे समजून घेणे गरजेचे आहे.
कधी मुलांचे मन शांत नसते. शाळेत काही ताण आलेला असतो, मित्रांमध्ये वाद झालेला असतो किंवा एखाद्या शिक्षकांची भीती मनात घर करुन असते. अशा वेळी ते त्यांच्या भावना व्यक्त करु शकत नाहीत, पण त्या मनात दाटून राहतात. या भावनांमुळेच कितीही वेळ पुस्तकासमोर बसले तरी शब्द डोक्यात शिरत नाहीत.
काही मुलांना अभ्यास समजण्यात अडचण येते. विषय कठीण वाटतो, अक्षरे धूसर दिसतात, एकाग्रता कमी असते किंवा वाचन-लेखनाची गती मंद असते. अशा वेळी मुले मुद्दाम असे मागत नाहीत. त्यामागे मुलांचा वाईट हेतू नसतो, त्यांना खरोखर मदतीची गरज असते. पण 'तो कधीच अभ्यास करत नाही' असा शिक्का बसला की त्यांना स्वतःवरच विश्वास उरत नाही.
घरचे वातावरणही महत्त्वाचे असते. सतत होणारे भांडण, गोंगाट, स्क्रीनचा अति वापर, झोपेचा अभाव किंवा अनियमित दिनक्रम यामुळे मुलांचे मन स्थिर राहत नाही. पोटात भूक असणे, अंगात थकवा असणे किंवा आरोग्य नीट नसेल तरी मुलांचा अभ्यासात रस राहत नाही. कधी शरीर सांगत असते की त्याला विश्रांती हवी आहे.
काही मुलांचा स्वभावच वेगळा असतो. त्यांना शांत बसणे कठीण जाते, सतत काहीतरी हालचाल हवी असते. अशा मुलांना अभ्यास पद्धत बदलून देणे गरजेचे असते, छोटे-छोटे ब्रेक्स, रंगीत नोट्स, मोठ्याने वाचन, चित्रांचा वापर हे उपाय त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात.
तसेच, भावनिक बदलही महत्त्वाचे आहेत. घर बदलणे, शाळा बदलणे, एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दूर होणे, या गोष्टी मन कोवळं असल्यामुळे थेट परिणाम अभ्यासावर करतात. अशा काळात त्यांना आधार, समज आणि वेळ मिळणे आवश्यक असते.
थोडक्यात, मुलांचे लक्ष लागत नाही म्हणजे त्यांची चूक असेलच असे नाही. ते कोणत्या तरी त्रासातून, गोंधळातून किंवा भीतीतून जात असू शकतात. त्यामुळे त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांच्याशी बोलणे, कारण समजून घेणे, त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे ठरते. मुलांचा आत्मविश्वास परत आला, मन स्थिर झाले की अभ्यास आपोआप सहज आणि आनंदाने होऊ लागतो.
