लहान मुलांचे मन अतिशय कोमल, संवेदनशील असते. त्यांच्याशी आपण जे बोलतो, ज्या शब्दांचा वापर करतो, त्या शब्दांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम होत असतो. अनेक वेळा नकळत पालक, मोठी माणसे किंवा शिक्षक मुलांशी बोलताना काही अशा संकल्पना वापरतात ज्या मुलांच्या आत्मविश्वासाला, भावनिक सुरक्षिततेला आणि विचारसरणीला इजा पोहोचवू शकतात. (A single bad word can leave a lifelong scar. Parents must follow some rules while talking to children )म्हणूनच लहान मुलांशी बोलताना पालकांनी फारच सावध आणि सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांशी बोलताना तुलना करणे ही सर्वात जास्त नुकसान करणारी सवय आहे. "पहा तो किती हुशार आहे", "तुझी बहीण तुझ्यापेक्षा किती नीट आहे" अशा वाक्यांमुळे मुलाच्या मनात स्वत:बद्दल कमीपणा निर्माण होतो. प्रत्येक मूल वेगळे असते, त्याची क्षमता, आवड, गती वेगळी असते. सतत तुलना झाल्यास मूल स्वतःला अपयशी समजू लागते किंवा दुसऱ्यांविषयी असूया बाळगू लागतात. याचा परिणाम त्याच्या आत्मसन्मानावर होतो. त्यांच्या मनात राग तयार होतो.
मुलांना कमी लेखणे किंवा हिणवणे ही दुसरी घातक संकल्पना आहे. “तू काहीच करू शकत नाहीस”, “तुझ्याकडून काही अपेक्षा नाही” अशी वाक्ये मुलांच्या मनावर खोल जखम करतात. ही जखम दिसत नसली तरी आयुष्यभर त्या मुलाच्या मनात राहू शकते. अशा शब्दांमुळे मूल घाबरट, अबोल किंवा अतिशय आक्रमक होऊ शकते.
मुलांशी बोलताना मोठ्यांनी मीपणा दाखवणे टाळले पाहिजे. “मी सांगतो तेच बरोबर”, “मला सगळं कळतं, तुला काहीच समजत नाही” अशी भाषा मुलांच्या विचारक्षमतेला दाबून टाकते. तसेच पुढे जाऊन त्यांच्या मनातही स्वाभिमान नाही तर अहंकार तयार होतो.
कधी कधी रागाच्या भरात वापरलेले शब्द, जसे की ओरडणे, धमकावणे किंवा भीती दाखवणे, मुलांमध्ये असुरक्षितता निर्माण करतात. अशा वातावरणात वाढलेली मुले स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाहीत. चूक केली की शिक्षा होईल या भीतीने खोटे बोलायला लागतात. तसेच ते स्वतःही अरेरावी करायला लागतात.
पालकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की मुलांशी बोलताना शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाची असली तरी शब्द जपूनच वापरावे. प्रेम, समजूतदारपणा आणि संयमाने बोललेले शब्द मुलाला मानसिक बळ देतात. चूक झाली तरी समजावून सांगणे, प्रोत्साहन देणे, वेगळे प्रसंगी ओरडणे मात्र शब्दांची निवड योग्य करणे गरजेचे असते. मुलांचे व्यक्तिमत्व कसे घडते यात या शब्दांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बोलताना काळजी घेणे फार गरजेचे असते.
