Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तिला सगळं जमतं, मला का नाही येत?' रील बघून 'कॉम्प्लेक्स' येतो, ‘ही’ रिॲलिटी वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:32 IST

स्क्रीनवरची 'सुपरवुमन' आणि आपलं 'घामाघूम' जगणं; तुलना करण्यापूर्वी रील आणि रिॲलिटीतला फरक नक्की वाचा!

सण-उत्सवाचे दिवस आले की घराघरांत लगबग सुरू होते. पण आजकाल ही लगबग केवळ स्वयंपाकघरात नसते, ती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरही ओसंडून वाहत असते. सण सुरु होण्याआधीच रील स्टार परफेक्ट फ्रेम वाटावी असे जेवण, सजावट, सेलिब्रेशचे चित्र आपल्यासमोर २ सेकंदाच्या व्हिडिओतून उभे करतात. ते पाहताना हाताला पिठाचे डाग लागलेली आणि घामाने डबडबलेली 'ती' स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागते. 

'रील'मधली स्त्री साग्रसंगीत पुरणवरणाचा स्वयंपाक करते, लक्ख केलेले दिवे तेवत ठेवते, सुबक रांगोळी काढते आणि पुढच्याच सेकंदात नऊवारी साडी, नथ, केसांत गजरा माळून 'टिपटॉप' तयार होऊन कॅमेरासमोर येते. रीलमधल्या तिला पाहताना रिअलमधली ती मनातल्या मनात म्हणते— "हिला कसं सगळं जमतं? मलाच का नाही जमत?"

ही तुलना करण्याआधी चला जाणून घेऊ रीलची 'ती' आणि आपली 'रिॲलिटी'

मोबाईलच्या पाच-दहा इंचाच्या स्क्रीनवर दिसणारं जग हे 'आभासी' जग आहे. आपण जेव्हा एखाद्या रीलमध्ये त्या बाईला बघतो, तेव्हा आपल्याला फक्त तिचं 'फिनिश्ड प्रॉडक्ट' दिसतं, तिची प्रोसेस नाही.

१. सिनेमाची नटी आणि रीलची स्टार

आपण जेव्हा पडद्यावर एखाद्या नटीला पाहतो, तेव्हा आपल्याला ठाऊक असतं की तिला नटवायला एक वेगळी व्यक्ती आहे, तिला डान्स शिकवायला कोरिओग्राफर आहे, तिचं गाणं कुणीतरी दुसऱ्यानेच गायलंय आणि तिच्या संवादांसाठी लेखक आहे. ती एक 'कलेक्टर' आहे. रील स्टार्सचंही अगदी असंच असतं.

ती जेव्हा साग्रसंगीत स्वयंपाक करताना दिसते, तेव्हा तो व्हिडिओ १०-१५ मिनिटांचा नसतो, तो तासनतास घेतलेल्या 'शॉट्स'चं कोलाज असतं. तो स्वयंपाक करून ती जेव्हा तयार होते, तेव्हा कदाचित मागच्या बाजूला सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर पडलेला असतो, जो कॅमेऱ्यात कधीच दिसत नाही.

२. थकवा विरुद्ध फिल्टर

आपल्याला स्वयंपाक करून 'दम' लागतो, कारण आपण तो स्वयंपाक वाढण्यासाठी आणि घरच्यांची पोटं भरण्यासाठी करतो. रीलमध्ये दिसणारा स्वयंपाक अनेकदा केवळ 'शूट' करण्यासाठी असतो. तिथे घाम पुसायला एडिटिंग असतं आणि चेहऱ्यावरचा थकवा लपवायला 'फिल्टर्स' असतात. आपल्या वास्तवात फिल्टर नसतात, तिथे फक्त कष्टाचा प्रामाणिक घाम असतो. तो घाम वाईट नाही, तो आपल्या अस्तित्वाचा आणि कष्टाचा पुरावा आहे.

३. 'परफेक्ट फॅमिली'चा आभास

अनेक रीलमध्ये घरची सगळी माणसं एकत्र हसताना, नाचताना दिसतात. आपल्याला वाटतं, "आमच्याकडे सणावाराला कुरबूर का होते? यांच्याकडे सगळं कसं गुडी गुडी चालतं" पण लक्षात घ्या, कॅमेरा सुरू होण्यापूर्वी तिथेही वाद झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'हॅपी फॅमिली'चा रील म्हणजे केवळ १५ सेकंदांचा समझोता असू शकतो. आपल्या घरात होणारे वाद हे जिवंतपणाचं लक्षण आहेत. सणवाराची धावपळ, कामाचा ताण यातून चिडचिड होणं मानवी स्वभाव आहे. रीलमध्ये स्वभाव नसतात, तिथे फक्त 'एक्सप्रेशन्स' असतात.

४. साडी, रांगोळी आणि मेकअप

साडी नेसून, नटून-थटून रांगोळी काढणं हे दिसायला सुरेख दिसतं, पण प्रत्यक्षात रांगोळी काढताना मोडलेली कंबर आणि साडी सावरताना होणारी कसरत आपल्याला माहिती आहे. रीलमध्ये ती फक्त एक 'पोज' असते. त्यासाठी तासनतास घेतलेले कष्ट आपल्याला माहीत नसतात. बघताना वाटते स्वयंपाक करून, मेक अप करून, साडी नेसून दागिने घालून, पूजेची तयार करूनही ती हसतमुख आणि आपण थकलेले. वास्तविक पाहता रील करणाऱ्या स्त्रिया सगळ्या गोष्टी एकाच दिवशी न करता टप्प्याटप्प्याने सगळं शूटिंग करतात. हे कधी दोन तीन दिवसात करतात तर कधी आठवडाभरात. एडिट केल्यामुळे आपल्याला सगळं एकाच दिवशी कशी काय करते असा प्रश्न पडतो, मात्र वास्तव तसे नसते. 

शेवटी एकच लक्षात घ्या...

रील बनवणं हा त्या स्त्रियांचा व्यवसाय (Profession) आहे, तुमचं ते आयुष्य (Life) आहे. व्यवसायाला ग्लॅमर असतं, आयुष्याला फक्त सत्य असतं. त्यामुळे स्क्रीनवरच्या त्या 'परफेक्ट' बाईशी स्वतःची तुलना करून कॉम्प्लेक्स आणून घेऊ नका.

तुमची पुरणपोळी थोडी फाटली तरी चालेल, तुमचा मेकअप थोडा घामाने ओघळला तरी हरकत नाही आणि सणादिवशी घरच्यांशी थोडा वाद झाला तरी चालेल— कारण तुमचं जगणं रीयल आहे, रील नाही!

English
हिंदी सारांश
Web Title : Reel vs. Real: Stop comparing yourself to social media perfection.

Web Summary : Don't compare your real life to the curated perfection of social media reels. Remember reel life is often staged, filtered, and a profession, while your life is authentic. Embrace imperfections and real moments.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियामहिलामानसिक आरोग्यसुंदर गृहनियोजनभारतीय उत्सव-सण