रात्र झाली, सगळं शांत झालं की आपण बिछान्यावर पडतो. पण डोळे मिटायला जाताच एक विचित्र भीती मनात येते. कुणीतरी आसपास आहे असं वाटतं, अचानक काहीतरी दिसेल अशी भीती वाटते असं काही वाटलं नाही तरी बरेचदा झोप येत असली तरी डोळे बंद करवत नाहीत. मग झोप येण्याऐवजी मन आणखी अस्वस्थ होतं. (Are you afraid to even close your eyes while sleeping at night? Here's the simple reason for feeling so scared..)अनेकांना हा अनुभव येतो, पण त्यामागचं कारण नेहमीच गंभीर असतं असं नाही, कधी कधी ते खूपच साधं असतं.
आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात मोबाइल, वेब सिरीज आणि सिनेमा पाहणं मोठा भाग झाला आहे. त्यातही मारामाऱ्या, खूनखराबे, थरारक दृश्यं किंवा भुताखेतांचे सिनेमे आपण सहजपणे पाहतो. पाहताना ते फक्त मनोरंजन वाटतं, पण त्याचा परिणाम नकळत आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी असे दृश्य पाहिल्यास मेंदू ते लगेच विसरत नाही.
आपला मेंदू वास्तव आणि कल्पना यामध्ये फरक ओळखू शकतो, पण भावना मात्र तशाच राहतात. त्यामुळे आपण जरी हे फक्त सिनेमा आहे, असं स्वतःला सांगितलं, तरी त्या दृश्यांची भीती, आवाज, अंधारातील कल्पना मनात रेंगाळत राहतात. जेव्हा आपण डोळे बंद करतो, तेव्हा बाह्य जग बंद होतं आणि मनातील चित्रं जास्त स्पष्ट दिसायला लागतात आणि तिथेच भीती वाढते. विशेषतः ज्यांची कल्पनाशक्ती जास्त तीव्र असते किंवा जे लोक आधीच थोडे संवेदनशील असतात, त्यांना हा त्रास अधिक जाणवतो. अंधार, शांतता आणि एकटेपण यामुळे मन त्या पाहिलेल्या गोष्टींना पुन्हा जिवंत करतं. त्यामुळे डोळे बंद करणेही कठीण वाटू लागतं.
यावर उपाय अगदी सोपे आहेत, पण सातत्याने पाळणं गरजेचं आहे. झोपण्याच्या आधी किमान एक तास तरी हिंसक किंवा भितीदायक कंटेंट पाहणे टाळावे. त्याऐवजी हलकंफुलकं काहीतरी पाहणं, पुस्तक वाचणं किंवा शांत संगीत ऐकणं मनाला स्थिर करतं. झोपण्याआधी मोबाइल बाजूला ठेवून काही वेळ स्वतःसोबत शांत बसणंही खूप उपयोगी ठरतं. हे अगदी सामान्य कारण आहे. मात्र जर झोपेचा फारच त्रास असेल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
