डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
दुसऱ्या महायुद्धानंतर आजपर्यंत सुमारे २५० लहानमोठी युद्ध लढली गेली, त्यापैकी बरीच युद्ध दशकभर चालली. बहुसंख्य युद्धात गरीब देश सहभागी होते. युद्धाचे लहान मुलांवर होणारे परिणाम हे अंतहीन असून, त्यात त्यांचा मृत्यू, वेदना, विस्थापन, शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्व, मानसिक आघात, कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू, बलात्कार, लैंगिक शोषण, बळजबरी लष्करात भरती, उपासमार असं बरंच काही घडत असतं. अठरा वर्षापेक्षा कमी वयाची सुमारे शंभर कोटीहून जास्त मुले आज युद्धग्रस्त देशात राहतात. ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत, अशी मुलंही याच युद्ध लढणाऱ्या देशांतली आहेत.
इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या एका शाळेवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात किमान १६८ मुली मृत्युमुखी पडल्या. यापूर्वी २०२४च्या डिसेंबर महिन्यात तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधल्या पेशावर येथील सैनिकी शाळेतल्या मुलांची १३५ शाळकरी मुले मारली गेली होती. सकाळी शाळेत गेलेली मुलं मोठ्यांच्या युद्धात मरतात हे किती दु:खद आहे. अशी उदाहरणं प्रत्येक देशातली देता येतील. युद्ध आणि दहशतवादाच्या क्रौर्याची ही उदाहरणं आहेत.
या साऱ्यात बालहक्काची पायमल्ली तर होतेच मानवाधिकारांनाही तिलाजंली दिली जाते. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनांनी मन सुन्न होते. कोवळ्या निरागस मुलांच्या हत्येचे, दहशतवादाचे आणि युद्धाचे अनिष्ट परिणाम दूर लांब राहणाऱ्या मुलांच्या मनावरही होत असतात. ते बातम्यांचे व्हिडिओ पाहात-ऐकत असतात. मुलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात, मानसिक किंवा सामाजिक विकासावर आघात होतात आणि ते विध्वंसक अन् दीर्घकाळ टिकणारे असतात.
प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या शिकण्यावर आणि अभ्यासावर युद्धपरिस्थितीचे दुष्परिणाम सर्वाधिक होतात. ती कोवळी पोरं मनातल्या भीतीने पार दबलेली असतात. त्यातून या मुलांत रात्री बिछाना ओला करणे, अंगठा चोखणे या बालमानसिक समस्या उद्भवतात.
टिनएजर्समध्ये औदासीन्य आढळतं; पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात सूड उगवण्याची भावना निर्माण होते. हीच मुलं पुढे हिसंक होतात. युद्ध आणि दहशतवादाने मुलांत ‘पोस्ट ट्राॅमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ होण्याची शक्यता असते. यात मुलांचे वर्तन गोंधळलेले, दिशाहीन व चिडके झालेले असते. काहींना औदासीन्य येते. निद्रानाशासारख्या समस्या उद्भवतात. हा आजार घटनेनंतर लगेच किंवा काही काळानंतरही उद्भवतो. वर्तमानपत्रात वाचून किंवा टीव्हीवरच्या भडक व रक्तरंजित बातम्या पाहूनही मुलांना हे त्रास होऊ शकतात.
अशी काही लक्षणं आढळल्यास मुलांचे काउन्सिलिंग करायला हवे. गरज असल्यास मानसिक उपचारही करायला हवेत त्यातून ते पूर्ण बरे होऊ शकतात. युद्धाच्या गोष्टी ऐकून, पाहून तशा धक्क्यांना सामोरे जाण्याची मुलांची शारीरिक कुवत नसते. पीटीएसडी अर्थात पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या मुलांना झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंतचे त्रास होऊ शकतात.
युद्ध आपल्यापासून लांब आहे तरीही पालकांना आपल्या मुलांच्या वर्तणुकीत किंवा झोपेच्या संदर्भात काही प्रश्न आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
मुलांवर काय परिणाम हाेतात?
प्रत्यक्ष युद्ध सुुरू असते त्या भागात तर मुलांचे मृत्यू, बलात्कार, दुखापत, हाडे मोडणे, हातपाय कापण्याची वेळ, डोक्याला मार बसणे, गोळीबारात-बाॅम्बस्फोटात जखमी होणे, भाजणे, रासायनिक आणि जैविक कुपोषण, उपासमार, संसर्गजन्य आजार, विस्थापित होणे.
यासह मनावरही आघात होतात. कुटुंबातील व्यक्ती गमावणे, समाजापासून अलग होणे, शिक्षणापासून वंचित राहणे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणे, मनावर ताण येणे, पोस्ट ट्राॅमॅटिक स्ट्रेस डिसाॅर्डर, औदासीन्य, परिस्थितीशी नीट जुळवून न घेता येणं, याशिवाय बालशोषण ते बळजबरी सैन्यात भरती, दहशतवादी कारवायात ओढणे, वेश्याव्यवसाय, गुलामी, बळजबरी दत्तक असे परिणाम होतात.
युद्धाने मुलांच्या मानसिकतेचं काय होतं?
लहान मुलांच्या अर्थात ६ वर्षे वयापर्यंतच्या मुलांत विभक्त होण्याची भीती, परावलंबी वृत्ती, मुले खूप रडणे, किंचाळणे, हलचाली मंदावणे, थिजून जाणे, झोपेच्या समस्या, भयभीत होणे अशी लक्षणं दिसतात.
७ ते ११ वर्षे वयाेगटातल्या मुलांत शाळेत अभ्यासातली प्रगती ढासळणे, तुच्छताभाव वाढणे, झोपेच्या समस्या, मानसिक ताणतणाव, नैराश्य किंवा दुःखाचे शारीरिक आजारात परावर्तन होणे. उदा. डोकेदुखी. थकवा, पोटदुखी वाढणे.
मुलांचा वर्तनबदल
काही मुलांमध्ये अतिआक्रमकता, तर्कहीन भीती, प्रतिगामी आणि बालिश वर्तन, भीती, स्वमग्नता, काळजी अशी लक्षणं दिसतात तर १२ ते १७ वर्षे वयाच्या मुलांमध्ये अभ्यासावरचे चित्त उडणे, झोपेच्या समस्या, भूतकाळातील दृश्य आठवणे, भावना बोथट होणे, समाजविरोधी वर्तन, व्यसनाधीनता, सूड कल्पना, आत्महत्येचे विचार असंही कमी जास्त प्रमाणात दिसू शकतं.
जगभरात प्रयत्न
युद्ध आणि दहशतवादग्रस्त देशांत लहान मुलांच्या हक्कांची व मानवाधिकाराची पायमल्ली होते. विकसित होण्याच्या अधिकारापासून, कुटुंबात व समाजात राहण्याच्या अधिकारापासून, आरोग्यदायी अस्तित्वाच्या अधिकारापासून वंचित राहतात. लहान मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी इंटरनॅशनल रेडक्राॅस, युनिसेफ, युनायटेड नेशन्स रेफ्युजी एजन्सी,इन्टरनॅशनल रेस्क्यू कमिटी, जागतिक आरोग्य संघटना, डाॅक्टर्स विदाऊट बाॅर्डर यासारख्या सामाजिक व अशासकीय संघटना कार्यरत आहेत. अशावेळी पालकांची, वैद्यक व्यावसायिक, बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सोशल वर्कर आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असते. सर्वप्रथम मुलांना ते सुरक्षित आहेत, याची खात्री करून घ्यावी लागते. यासाठी प्रथम पालकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपणच चिंतेने ग्रासले आहोत, याची जाणीव मुलांना होऊ देऊ नका. आपल्या संरक्षणासाठी असलेली यंत्रणा व लोक सजग असून, ते विश्वासार्ह आहेत ही गोष्ट मुलांना सांगायला हवी. मुलांच्या मनात जे सुुरू असेल ते ऐकून घ्यावे. मुलं साेशल मीडियात काय पाहतात, कसे वागतात याकडे लक्ष ठेवावे.
