डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
नाकात शेंगदाणे-फुटाणे घालणारे, झिप व्हिक्टिम्स बालरूग्ण ओपिडीत नियमित येतात. माती खाणारे तर कॅामन आहेत. आज पहिल्यांदाच एका साबण खाणाऱ्या बालकाशी भेट झाली. वय होतं सात आणि सिलसिला सुरू होता गेल्या तीन वर्षांपासून. त्या मुलाला मारणं-त्याच्या हाती साबण लागणार नाही अशी व्यवस्था पालकांनी करणं-जुजबी सल्ले-उपचार सगळं करून झालं होतं. पण कालपरवा पठ्ठ्यानं दिड दिवसात दोन साबण संपवल्यानं चिंतित पालक त्याला घेऊन आले होते.
घरी लपवून ठेवले म्हणून महाशयांनी चक्क शेजारच्या घरी चोरी केली होती. अधुनमधून थोडेफार जुलाब या व्यतिरिक्त त्याला काही त्रासही नव्हता..
‘सॅपोफेजिया’ हा ‘पिका’ या मनोविकाराचा एका उपप्रकार आहे ज्यात रुग्णात खाण्यायोग्य आणि पोषणमूल्य नसलेल्या गोष्टी खाण्याची इच्छा बळावते.
बरेचसे साबण तसे माईल्ड असतात त्यामुळं लागलीच आणि मोठा काही त्रास होत नाही परंतू कालांतरानं दुष्परिणाम जाणवू लागतात. जवळपास सगळ्या साबणांचा pH अल्कलाईन असतो त्यामुळं पचनसंस्था गडबडते. हळूहळू यकृत बाधित होते ज्याचं रुपांतर अपचनापासून कर्करोगापर्यंत काहीही होऊ शकतं..
हे का?
१. आयर्न-झिंक या सारख्या पोषणमुल्यांची कमतरता. गर्भधारणेदरम्यान मातेस किंवा पोटातील बाळास अश्या कमतरता राहिल्यास पुढं ‘काहीही’ खाण्याच्या इच्छा बळावतात..
२. उतारवयातही स्मृतीभ्रंशामुळं काही लोकं साबण खातात. बालपणात साबण खाण्याची सुरूवात अनेकदा कुतूहल आणि खोडकरपणातून होते आणि शरीरात पोषणमूल्यांची कमतरता असल्यास हे दिवसेंदिवस बळावत जातं..
३. स्वमग्नता,गतीमंदपणा अशी काही इतर कारणंही यामागं असू शकतात. अशा सवयी सहजासहजी जात नाहीत तरी ‘प्रतिबंध’ हाच इथंही मुलमंत्र ठरतो.
४. साबण लपवून ठेवण्यासारख्या ढोबळ उपायांपेक्षा पोटात नियमित पोषणमूल्ये जातील याची काळजी घेणे, रागावण्यापेक्षा प्रशिक्षित करणे, भिती घालण्यापेक्षा समजावून सांगणे परिणामकारक ठरते..
५. घातक सवयी बदलण्यासाठी संज्ञानात्मक थेरपीही उपयुक्त ठरते..
६. थेट कॅल्शियम-झिंक-आयर्न सप्लिमेंटचा चांगला उपयोग होतो..
७. आता हिवाळ्यात तर मी पालकांना डिंकाच्या वड्या बनवण्याचा सल्ला दिला. गोल काय किंवा चौकोनी काय पोटात पोषक घटक जाणं आणि आकारामुळं मानसिक समाधान होणं हे महत्वाचं..