Water Drinking Tips : फिट आणि दिवसभर ऊर्जावान ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जातात. चालायला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. पण सोबतच काही छोटे छोटे नियम पाळणंही महत्वाचं असतं. तरंच फायदे मिळू शकतात. चालून घरी आल्यानंतर काही लोक लगेचच भरभर पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ही सवय आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अशात वॉक केल्यानंतर लगेच जास्त पाणी का पिऊ नये. हे समजून घेऊन लक्षात ठेवणं महत्वाचं ठरतं.
वॉकदरम्यान थोडे-थोडे पाणी प्या
एक्सपर्ट सांगतात की, चालताना शरीरातील पाणी आणि मीठ घामाद्वारे बाहेर पडतं. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. हे टाळण्यासाठी वॉकदरम्यान मधूनमधून थोडं-थोडं पाणी पिणे चांगलं असतं. पण वॉक संपताच घरी येऊन लगेच अनेक ग्लास पाणी पिणं टाळावं. कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या किंवा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकतं. त्यामुळे घरी आल्यानंतर 15–20 मिनटं विश्रांती घ्या आणि मग हळूहळू पाणी प्या.
होऊ शकतात या समस्या
वॉकनंतर शरीरातील रक्तप्रवाह प्रामुख्याने स्नायूंमध्ये असतो. अशा वेळी लगेच जास्त पाणी प्यायल्यास पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. एकाच वेळी खूप पाणी प्यायल्याने शरीरातील आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात. थोडा वेळ थांबल्याने शरीराला पुन्हा नॉर्मल होण्याची संधी मिळते आणि पाणी योग्य प्रकारे शोषले जाते.
वॉकनंतर हायड्रेशनसाठी टिप्स
वॉक संपल्यानंतर 15–20 मिनिटांनी पाणी पिण्यास सुरुवात करा.
पुढील 1–2 तासांमध्ये हळूहळू पाणी पित राहा.
जर वॉक जास्त वेळ किंवा वेगाने केला असेल, तर सुमारे 450–680 मिलीलीटर पाणी प्या.
गरज असल्यास 15–30 मिनिटांनंतर पुन्हा पाणी प्या आणि इलेक्ट्रोलाइट्स समाविष्ट करू शकता.
वॉकपूर्वी, वॉकदरम्यान आणि वॉकनंतर शरीर हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. पण वॉकनंतर लगेच जास्त पाणी न पिता, हळूहळू आणि सातत्याने पाणी पिण्यावर भर दिल्यास शरीराची रिकव्हरी अधिक चांगल्या प्रकारे होते.
