Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Healthy Diet: आपल्यासाठी कोणते डाएट योग्य? हे ओळखण्याचे गुपित सांगताहेत शेफ विकास खन्ना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:14 IST

Healthy Diet: डाएट फॉलो करावा पण कोणाचा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो, यावर शेफ विकास खन्ना यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल.

''अनेक वर्षं अन्न हे फक्त माझं प्रोफेशन आहे असं मला वाटायचं, पण आता उमजलंय की, आहार या विषयात माझ्या जगण्याचे सार सामावले आहे'', हे शब्द आहेत प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांचे. तासनतास विमान प्रवास, उशिरापर्यंत चालणारे प्रोजेक्ट्स आणि बदलणारे टाइम झोन्स यांमुळे शरीराची नैसर्गिक लय हरवलेल्या विकास खन्ना यांना आहाराने स्वास्थ्य जपण्याचा आणि स्वस्थ मनाचा एक नवा मार्ग दाखवला आहे.

प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांनी आहार आणि जीवनशैलीबद्दल व्यक्त केलेले हे विचार केवळ एका शेफचे अनुभव नाहीत, तर ती आजच्या धावपळीच्या युगात जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक 'वेक-अप कॉल' आहे. 

शरीराचा थकवा की लयीचा अभाव?

विकास खन्ना म्हणतात की, ''जेव्हा आपण सतत धावत असतो, तेव्हा शरीर हळूहळू सकाळ आणि रात्र यातला फरक विसरू लागतं. थकवा आधी शरीरात येतो, पण मग तो शांतपणे मनात प्रवेश करतो. यामुळे आपण आपली स्पष्टता, संयम आणि कृतज्ञता देखील हरवून बसतो. "मी कामामुळे थकलो नव्हतो, तर माझी जीवनशैलीची लय बिघडल्यामुळे थकलो होतो," असं ते प्रांजळपणे कबूल करतात.

आहाराची भूमिका :

जेव्हा आयुष्याची नौका भरकटते, तेव्हा 'डाएट' (Diet) हा तुमच्या जीवन नौकेचा नावाडी बनतो. विकास खन्ना यांनी अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी अन्न हे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर शरीराची निसर्गाशी सांगड घालण्यासाठी वापरायला सुरुवात केली.

त्यांनी अंगीकारलेले काही साधे पण प्रभावी बदल:

सूर्योदयापूर्वी कोमट पाणी: शरीराला शुद्ध करण्यासाठी.

साधे आणि हंगामी जेवण: निसर्गात त्या त्या ऋतूत जे पिकतं, तेच शरीरासाठी उत्तम.

साखर आणि ग्लूटेनचा कमी वापर: शरीरातील जळजळ आणि आळस टाळण्यासाठी.

सूर्यानुसार जेवण: घड्याळाच्या काट्यांपेक्षा सूर्याच्या स्थितीनुसार जेवल्याने मन अधिक शांत आणि विचार स्पष्ट होतात.

पोट आणि मन

आपण अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्य वेगवेगळं मानतो, पण विकास खन्ना यांच्या मते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपली पचनसंस्था ही भावना, ऊर्जा आणि स्मृती साठवून ठेवते. जर पोट अस्वस्थ असेल, तर मन कधीच स्थिर राहू शकत नाही. शरीर जेव्हा योग्यरित्या पोसलं जातं, तेव्हाच भावनिक स्थिरता मिळते.

जेट लॅग आणि पचनशक्ती

'जेट लॅग' (Jet Lag) म्हणजे विमान प्रवासातील थकवा किंवा वेळेतील फरकामुळे होणारा शारीरिक थकवा! ते म्हणतात, 'वेगवेगळ्या खंडांत प्रवास करताना त्यांना एक महत्त्वाची गोष्ट उमजली – 'जेट लॅग' हा केवळ झोपेशी संबंधित नसून तो पचनाशी संबंधित आहे. जेव्हा आपण अन्न, प्रकाश आणि दिनक्रमाद्वारे शरीराला वेळेची जाणीव करून देतो, तेव्हा मन पुन्हा एकदा शांतता शोधू शकतं.'

शिस्त म्हणजे 'आत्मसन्मान'

"आहारातील शिस्त म्हणजे स्वतःवर घातलेली बंधनं नसून तो स्वतःप्रती असलेला आदर (Self-respect) आहे," असं विकास खन्ना सांगतात. अनेकदा आपण या नियमात अपयशी ठरतो, पण प्रयत्न सोडू नयेत. आपल्या नियमांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. शरीरावर जाच न करता, त्याची गरज ओळखून आवश्यक तेवढे अन्नसेवन करावे. कारण अन्न केवळ ऊर्जा देत नाही, तर अंतर्मनातील 'शांततेला' (Peace) जपतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Chef Vikas Khanna's guide to finding the right diet for you.

Web Summary : Chef Vikas Khanna emphasizes that diet is crucial for physical and mental well-being, especially with hectic lifestyles. He recommends simple changes like eating seasonally, limiting sugar and gluten, and aligning meals with the sun to improve digestion and mental clarity.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामानसिक आरोग्यलाइफस्टाइलअन्न