उन्हाळा सुरू झाला की थंडगार पाणी पिण्याची इच्छा वाढते. बाहेरच्या उन्हातून आल्यावर फ्रिजमधलं अगदी गार पाणी किंवा बर्फ टाकून पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. त्या क्षणी ते खूप ताजेतवाने वाटतं, पण खूप थंड पाणी वारंवार पिणं आरोग्यासाठी योग्य नसतं. शरीराच्या तापमानापेक्षा खूप थंड पाणी घेतल्याने काही त्रासही होऊ शकतात.
आपलं शरीर साधारण ठराविक तापमानावर व्यवस्थित काम करतं. खूप थंड पाणी अचानक पोटात गेलं की शरीराला ते तापमान संतुलित करण्यासाठी अतिरिक्त काम करावं लागतं. त्यामुळे काही वेळा पचनक्रिया मंदावते. जेवणानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास अन्न पचायला जास्त वेळ लागू शकतो आणि पोट जड झाल्यासारखं वाटू शकतं.
अति थंड पाणी प्यायल्याने काहींना घशात खवखव किंवा घसा दुखण्याचा त्रासही होऊ शकतो. विशेषतः उन्हातून आल्यावर लगेच बर्फासारखं थंड पाणी प्यायलं तर घशाला आतून जरा सुन्नपणा येऊ शकतो. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा घशात त्रास जाणवण्याची शक्यता वाढते.
खूप थंड पाणी प्यायल्याने काही वेळा डोकेदुखीही जाणवू शकते. अचानक थंडपणा शरीरात गेल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काहींना ब्रेन फ्रीझसारखी डोकेदुखी जाणवते. डोक्यात सणक जाते म्हणतात तसंही होतं.
याशिवाय खूप थंड पाणी पिण्याची सवय असेल तर तहानही वारंवार लागू शकते. कारण अतिथंड पाणी शरीराला तात्पुरता थंडावा देतं, पण शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे पाणी प्यायल्यानंतरही पुन्हा तहान लागल्यासारखं वाटू शकतं. (Drinking Ice-Cold Water in Summer? It May Harm Your Body – Follow These Tips)गटागटा प्यायलं तर पोटाला ते अजिबातच झेपत नाही आणि उलटीही होऊ शकते.
म्हणूनच उन्हाळ्यात पाणी पिणं महत्त्वाचं असलं तरी ते अतिथंड नसावं. माठाचं पाणी किंवा साधं थंडगार पण बर्फ न घातलेलं पाणी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. त्यामुळे शरीराला योग्य थंडावा मिळतो आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होत नाही. योग्य सवयी ठेवल्या तर उन्हाळ्यात शरीर ताजं आणि निरोगी ठेवणं नक्कीच शक्य होतं.
