बेसन पीठ म्हणजे हरभर्यापासून तयार होणारे पीठ. चण्याच्या डाळीचे पीठ. आपल्या भारतीय स्वयंपाकघरात याचा वापर रोजच्या आहारात केला जातो. तसेच औषधी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या पीठाचा वापर करतात. चव, पोषण आणि गुणधर्म या सगळ्या गोष्टी यात असतात. त्यामुळे आहारात हे पीठ नक्की असावे. बेसन पिठामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. (Use gram flour not only for vadas and bhajis but also for 'these' things - see how beneficial a spoonful of gram flour is)त्यामुळे शरीराच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होते आणि स्नायू मजबूत राहतात. शाकाहारी लोकांसाठी बेसन हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. यामध्ये फायबरही चांगल्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही बेसन उपयोगी ठरते. मात्र तळणीसाठी वापरलेले बेसन नाही तर वेगळ्या पद्धतीने वापरलेले हवे.
बेसन पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्यामुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी मर्यादित प्रमाणात बेसनाचे पदार्थ योग्य ठरु शकतात. तसेच यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात, जी रक्तनिर्मिती तसेच हाडांचे आरोग्य आणि मज्जासंस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदयाच्या आरोग्यासाठीही बेसन फायदेशीर मानले जाते. यातील फायबर आणि चांगल्या प्रकारची चरबी कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. नियमित आणि संतुलित आहारात बेसनाचा समावेश केला तर हृदयविकाराचा धोका कमी होण्यास हातभार लागतो.
बेसन पिठाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याची त्याची क्षमता. काही पदार्थांमध्ये बेसनाचा वापर केल्यास पचन नीट होते आणि अंगावर उष्णता जास्त चढत नाही, विशेषतः योग्य प्रमाणात आणि योग्य घटकांसोबत वापरल्यास. बेसन पीठ त्वचेसाठी तर नैसर्गिक वरदानच आहे. पारंपरिक सौंदर्यउपचारांमध्ये बेसनाचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. बेसन त्वचेवरील मळ, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ, ताजीतवानी आणि उजळ दिसते. नियमितपणे बेसनाचा लेप लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक चमक येते.
मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेसाठी बेसन खूप उपयुक्त ठरते. ते त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि छिद्रे स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मुरुम कमी होण्यास आणि नवीन मुरुम येण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. बेसनात थोडी हळद किंवा चंदन मिसळून लावल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.
बेसन पीठ त्वचेचा टोन समतोल ठेवण्यासही मदत करते. उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसनाचा लेप उपयुक्त ठरतो. यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ दिसते, पण कोणतीही कृत्रिम रसायने वापरण्याची गरज राहत नाही. याशिवाय, बेसनाचा लेप त्वचा मजबूत करण्यास मदत करतो. एकूणच पाहता, बेसन पीठ हे केवळ स्वयंपाकापुरते मर्यादित नसून आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात आहारात वापरले आणि त्वचेसाठी नैसर्गिक उपाय म्हणून वापरता येते. तर बेसन पीठ शरीराला आतून पोषण देते आणि बाहेरुन त्वचेला सुंदर, निरोगी ठेवण्यास मदत करते.
