Join us

Veg Recipe: हॉटेलसारखी पंचमेल दाल करा घरी, पाच डाळींचा मेळ म्हणजे भरपूर प्रोटीन आणि चवही मस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:01 IST

Panch Dal Recipe: डाळींमध्ये सर्वात जास्त प्रथिनं असतात, हे माहीत असूनही आपण तूर आणि मूग डाळीचा जास्त वापर करतो; त्यावर पंचमेल डाळ हा उत्तम पर्याय आहे. 

शाकाहारी लोकांसाठी प्रथिनं अर्थात प्रोटीन मिळवण्याचा उत्तम स्रोत डाळी हा आहे. रोजच्या जेवणात त्यांचा समावेश असायला हवा. रोज शक्य नसेल तर निदान एक दिवसाआड डाळ घरात शिजवली गेलीच पाहिजे. पोटात गेली पाहिजे आणि मुख्य म्हणजे एक दोन डाळी नाही तर सगळ्या प्रकारच्या डाळी. केवळ भातावर घालण्यापुरती आमटी करायची गरज नाही, मिश्र डाळींचे अप्पे, मिश्र डाळींचे डोसे, इडली, ढोकळा हेही पर्याय आहेत. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा हॉटेल स्टाईल पंचमेल डाळ आणि जिरा राईस असा फक्कड बेत केला तरी तो घरच्यांच्या पसंतीस उतरेल आणि पोषणमुल्येही जपली जातील. चला पाहूया रेसेपी!

पंचमेल डाळ रेसेपी 

साहित्य : 

पाव कप चणा डाळ, पाव कप सालासकट उडीद डाळ, पाव कप तूर डाळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप सालासकट मूग डाळ, अर्धा चमचा हळद, १ तमालपत्र, १ दालचिनीची स्टिक, ३ चमचे तेल, १ कप पाणी, चवीनुसार मीठ, जिरे, मोहरी, हिंग, ४-५ लसणाच्या पाकळ्या, मध्यम  आकाराचा चिरलेला कांदा, चार बारीक चिरलेले टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला, आलं, मिरची

कृती : 

>> सर्व डाळी ३-४ तास भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये घ्या.>> १/२ टीस्पून हळद पावडर घाला.>> चवीनुसार मीठ घाला.>> २-३ तमालपत्र, ३ लवंगा आणि १ दालचिनीची काडी घाला.>> १ चमचा तेल घाला.>> १ कप पाणी घाला आणि प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्ट्या करा.>> पुन्हा गरम करा. एका पॅनमध्ये १ चमचा तेल घाला.>> १ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, ३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १ बारीक चिरलेले आले, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.>> १ बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घाला.>> चवीनुसार मीठ घाला.>> कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या, त्यात ४ बारीक चिरलेले टोमॅटो घाला आणि शिजवा.>> १ चमचा हळद पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर, १.५ टीस्पून धणे-जिरे पावडर घाला आणि सर्व मसाले चांगले परतून घ्या. >> शिजवलेली डाळ घोटून घ्या आणि फोडणीत घाला. >> गरज पडल्यास पाणी घाला>> वरून १ चमचा गरम मसाला, २ चमचे कसुरी मेथी घाला, मिक्स करा आणि गॅस बंद करा

हॉटेल स्टाईल तडका देण्यासाठी वरून फोडणी घालू शकता :

त्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करा, गॅस बंद करा. त्यात थोडं जिरे, हिंग,  कसुरी मेथी, १ चमचा लाल मिरची पावडर घाला आणि ती फोडणी डाळीवर घाला. 

ही डाळ जिरा राईस तसेच पराठ्यांबरोबर चवीला उत्तम लागते. असा चमचमीत बेत आठवड्यातून एकदा व्हायलाच हवा, नाही का?

टॅग्स :अन्नपाककृतीहेल्थ टिप्सआरोग्यकिचन टिप्स