माघ महिन्यातील शुद्ध सप्तमी म्हणजेच रथ सप्तमी (Ratha Saptami 2026). हा दिवस सुर्यदेवाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष अध्यात्मिक महत्व आहे. रथ सप्तमीच्या दिवशी सुर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्यासाठी गाईच्या दुधाची खीर किंवा गुळवणी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी अंगणात सुर्याच्या प्रकाशात चुलीवर मातीच्या पात्रात दूध उकळवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
रथ सप्तमीनंतर ऋतू परिवर्तन होते. थंडी कमी होऊन उष्णता वाढते अशावेळी शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. खीर हा सात्विक आहार मानला जातो. तांदूळ, दूध आणि गूळ किंवा साखर यांचा संगम चंद्राच्या शीतलतेचे आणि सुर्याच्या तेलाचे प्रतीक मानला जातो. सुर्यदेवाचा नैवेद्य म्हणून खरी अर्पण केल्यानं घरात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते असी श्रद्धा आहे.
रथ सप्तमीसाठी स्पेशल खीर रेसिपी (Ratha Saptami Special Milk Kheer Recipe)
दुधाच्या खीर करण्यासाठी साहित्य काय लागेल?
ही खीर करण्यासाठी तुम्हाला 1 लीटर पूर्ण साय असलेलं गायीचं दूध, अर्धी वाटी बासमीत तुकडा तांदूळ लागेल. हा तांदूळ धुवून मग वाळवून घेतलेला असावा. पाऊण वाटी साखर किंवा सेंद्रीय गूळ, वेलची पूड आणि जायफळ पूड, ड्राय फ्रुट्सचे काप, 1 चमचा साजूक तूप हे साहित्य लागेल.
दुधाची खीर करण्याची सोपी रेसिपी
सर्वात आधी एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात तांदूळ हलके परतवून घ्या. त्यानंतर त्यात दूध घालून मंद आचेवर उकळवायला ठेवा. दूध आटत असताना तांदूळही त्यात व्यवस्थित शिजायला हवा. दूध अधून मधून ढवळत राहा जेणेकरून तळाला लागणार नाही. जेव्हा दूध दाट होईल आणि तांदूळ पूर्णपणे शिजेल तेव्हा त्यात साखर किंवा गूळ घाला. गूळ घालणार असाल तर गॅस बंद करून थोडा वेळ थांबून मगच गूळ घाला. जेणेकरून दूध फाटणार नाही. शेवटी वेलची पूड आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स बारीक काप करून घालू शकता. घरात केशर असल्यास ते त्यावर घालून गरमागरम खीर सुर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
