तुरीच्या शेंगा या भारतीय स्वयंपाकात चवीसाठी, पौष्टिकतेसाठी आणि पारंपरिक पदार्थ म्हणून आवर्जून वापरल्या जाणाऱ्या शेंगा आहेत. थंडीत तर खास खायलाच हव्यात. वाफाळत्या ताज्या तुरीच्या शेंगांची भाजी किंवा फक्त शेंगा वाफवून खालल्या तरी छान लागतात. पण या शेंगा फक्त चांगल्या चवीसाठीच नाहीत, तर शरीराला देणाऱ्या पोषणामुळेही खाल्या जातात. थंड हवेच्या दिवसांत तुरीच्या शेंगा खाल्ल्या तर शरीराला ऊर्जा, उष्णता आणि तंदुरुस्ती मिळते. यामागे अनेक कारणे आहेत.
तुरीच्या शेंगांमध्ये नैसर्गिक तंतुमयता भरपूर असते. त्यामुळे भाजी हलकी वाटते, पण पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. हिवाळ्यात भूक वाढते, आणि वारंवार खाण्याची इच्छा होते. अशावेळी अशी तंतुमय भाजी शरीरावर पोषक ठरते तसेच तृप्त ही करते. तिच्यातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवतं, पोटफुगी कमी करतं आणि बद्धकोष्ठता टाळतं.
या शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बी - कॉम्प्लेक्स ही महत्त्वाचे जीवनसत्वे असतात. थंडीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो, त्यामुळे व्हिटॅमिन सी भरपूर असलेले पदार्थ शरीराला संक्रमणांपासून वाचवतात. व्हिटॅमिन ए दृष्टीसाठी आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते, तर B-कॉम्प्लेक्स शरीराला ऊर्जा पुरवते. तुरीच्या शेंगांमध्ये लोहतत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खनिज घटकही चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील रक्तनिर्मिती सुधारते, हाडे मजबूत राहतात आणि स्नायूंना आवश्यक आधार मिळतो. थंडीच्या दिवसांत अनेकांना सांधे दुखी, स्नायू दुखी किंवा शरीर सुस्त होणे अशा तक्रारी असतात, अशावेळी खनिजांनी समृद्ध शेंगा उबदारपणा आणि ताकद देतात.
या शेंगा हलक्या पण पौष्टिक असल्यामुळे वजन वाढवत नाहीत तर संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्या कॅलरी कमी देतात पण पोषण भरपूर देतात, म्हणून पोटभर जेवणातही हलकेपणा जाणवतो. शिवाय शिजवल्यावर त्यांच्या चवीत एक नैसर्गिक गोडवा येतो, तो चवीला मस्त लागतो. वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर त्यात या पदार्थाचा समावेश नक्कीच करु शकता. हिवाळ्यात बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा सहज मिळतात आणि त्या ऋतूनुसार शरीराला योग्य पोषण देतात. म्हणूनच थंडीत या शेंगा खाण्याचा आनंद आणि उपयोग दोन्ही अधिक. चवही अप्रतिम आणि आरोग्यालाही साथ देणारी.
