Join us
Daily Top 2Weekly Top 5

आहारात हवे सैंधव मीठ, आरोग्यासाठी उत्तम आणि चवही छान - पचनाचे विकार राहतात दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 19:10 IST

Health Benefits of Rock Salt - A Natural Way to Boost Digestion : आरोग्यासाठी फायद्याचे असते हे गुलाबी मीठ. पाहा कसे खावे.

स्वयंपाकात मीठ हा अतिशय महत्त्वाचा घटक. साधे मीठ, समुद्री मीठ यांसोबतच सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) हेही आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात सैंधव मीठाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पचनासाठी हलके, शरीराला त्रास न देणारे आणि नैसर्गिक खनिजांनी भरलेले असल्यामुळे अनेक तज्ज्ञ आहारात सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला देतात.

सैंधव मीठ हे खाणीतून मिळणारे नैसर्गिक खडकातील मीठ असते. लाखो वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी काही भागात सुकून त्यातून मीठाचे थर तयार झाले. कालांतराने हे थर खडकांच्या स्वरूपात जमिनीत साठले. खाणीतून हे खडक काढले जातात आणि त्यांना स्वच्छ करून, दळून किंवा कुटून सैंधव मीठ तयार केले जाते. त्यामुळे हे मीठ प्रक्रिया कमी केलेले आणि नैसर्गिक स्वरुपात मिळणारे मानले जाते. सैंधव मिठामध्ये सोडियमसोबतच अनेक सूक्ष्म खनिजे असतात. (Health Benefits of Rock Salt - A Natural Way to Boost Digestion)त्यामुळे ते चवीला थोडे सौम्य आणि हलके असते. आयुर्वेदानुसार सैंधव मीठ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. काही लोकांना साधे मीठ जड जाते किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, अशा वेळी सैंधव मीठ हा उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच उपवासाच्या पदार्थांमध्येही सैंधव मीठ वापरण्याची परंपरा आहे.

याशिवाय सैंधव मीठ अॅसिडिटी कमी करण्यास, भूक वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकते. काही घरांमध्ये सैंधव मीठ, लिंबू आणि जिरे यांचे मिश्रण जेवणानंतर घेतले जाते, ज्यामुळे पोट हलके वाटते. गॅसेस होत नाहीत. अगदी मस्त असा उपाय आहे. तसेच हे मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करते असेही काही तज्ज्ञ सांगतात. सैंधव मिठाचा आणखी एक गुण म्हणजे ते चवीला सौम्य आणि संतुलित असते. त्यामुळे अनेक पदार्थांमध्ये ते सहज मिसळता येते. चव फार वेगळी लागत नाही. काही लोक सॅलड, ताक, लस्सी किंवा फळांवरही सैंधव मीठ घालून खातात, ज्यामुळे चव वाढते.

मात्र कोणतेही मीठ असले तरी ते मर्यादित प्रमाणातच वापरणे महत्त्वाचे आहे. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाबासारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे. एकूणच, सैंधव मीठ हे नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे, खनिजांनी भरलेले आणि आयुर्वेदात महत्त्वाचे मानले गेलेले मीठ आहे. योग्य प्रमाणात आहारात वापरले तर ते चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rock Salt: Healthy, Tasty, Aids Digestion - A Dietary Essential

Web Summary : Rock salt, rich in minerals, aids digestion and balances electrolytes. Ayurveda values it for its health benefits. It can reduce acidity, boost appetite, and is a flavorful addition to meals. Moderation is key for overall health.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना