आपली आई, आजी कडधान्य भिजवली की दुसऱ्या दिवशी उसळ करताना नेहमी कढण करायची हे आठवतं का? इन्स्टंट सूपच्या काळात आपण आपला हा पारंपरिक पदार्थ विसरत चाललो आहोत. कढण हा शब्द आला कढवण्याच्या प्रक्रियेवरून! हे सूप खळखळून उकळी येईपर्यंत कढवून घ्यायचे म्हणूनच त्याला कढण अशी ओळख मिळाली असावी.
प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं असं कमी वेळात, कमी कष्टात, कमी साहित्यात मुगाचं कढण करता येतं. त्यासाठी फार साहित्यही लागत नाही आणि घरी केलेल्या सुपामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचा धोका नसतो. वजन कमी कणाऱ्यांसाठी हा उत्तम पदार्थ आहे. ज्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात आणि पोट भरीला मदत होते. लंघन प्रक्रिया सोपी जाते. चला तर पाहूया मुगाचं आणि इतर कोणत्याही कडधान्याचं कढण करण्याची रेसेपी.
साहित्य :
पाव कप हिरवे मूग
त्याच कपाच्या १६ पट पाणी
फोडणीसाठी तूप
जिरे
हिंग
कोथिंबीर
सैंधव मीठ
कृती :
>> पाव कप मूग स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
>> हे सूप लगेच करायचे असेल तर हिरवे मूग काही मिनिटं भाजून घ्या.
>> त्यानंतर पातेल्यात मूग घेऊन त्यात सोळा पट पाणी घाला आणि मूग पूर्ण शिजेपर्यंत उकळून घ्या. त्यात चवीनुसार सैंधव मीठ घाला.
>> मुगाचे पातेले बाजूला करून फोडणीसाठी तूप घ्या, त्यात जिरे आणि हिंग टाका आणि चुरचुरीत फोडणी कढणावर घाला.
>> हे कढण तुम्ही गाळूनही पिऊ शकता किंवा शिजलेल्या मुगासकट पिऊ शकता.
>> पावसाळी दिवसात चहा तसेच मधल्या वेळेच्या भुकेला किंवा डाएट करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
इतर कडधान्यांचे कढण :
मुगाचे तसेच इतर कोणतेही कढण करताना कडधान्य शिजवून झाल्यावर वरचे पाणी काढून घ्या आणि त्यात आवश्यक तेवढे ताक आणि पाणी घालून वर दिलेली कृती करा. कोणत्याही कडधान्याचे पौष्टिक कढण पोटभरीचे ठरेल आणि वारंवार करून प्यावेसे वाटेल. बघा प्रत्यक्ष कृती -