लहान ते वृद्ध सगळ्यांनाच आराम पचेल आणि पोटालाही शांतता मिळेल असे पदार्थ खायलाच हवेत. असाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे मऊ खिचडी. लसणाची फोडणी नको आणि मोहरीचा तडका नको. ( Feed your children khichdi with ghee, superfood for children, try this healthy and tasty food)फक्त तुपावर परतलेली साधी खिचडी म्हणजे पोटासाठी फायद्याचा पदार्थ आहे. लहान मुलांच्या आहारात या खिचडीचा समावेश असायला हवा. यात भरपूर ऊर्जा आहे. पचनासाठी फार चांगली आहे. तसेच पोटभरीचा पदार्थ आहे.
मऊ खिचडीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे असतात. त्यात बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्व 'ए' हे घटक असतात. पचनक्रिया तर सुधारतेच आणि शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. तांदळामध्ये सहज पचणारे कार्बोहायड्रेट्स असतात, जे लहान मुलांना त्वरित ऊर्जा देतात. डाळीतून प्रथिने मिळतात, जी शरीराच्या वाढीसाठी अत्यंत गरजेची असतात. जर त्यात भाज्या टाकल्या, तर त्यातून आवश्यक खनिजद्रव्यं आणि जीवनसत्त्वं मिळतात, ज्यामुळे एकंदर शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी यासाठी ही मऊ खिचडी फायद्याची आहे. शिवाय करायला अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात करता येते. एकदा ही रेसिपी करुन पाहा. लहान मुलांना नक्की आवडेल. सगळ्यांनीच खायला हवी अशी खिचडी.
साहित्य
तांदूळ, मूग डाळ, तूप, जिरं, हळद, मीठ, पाणी
कृती
१. तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवायचे. सम प्रमाणात दोन्ही पदार्थ घ्यायचे. दोन ते तीन पाण्यातून काढायचे. एका कुकरमध्ये थोडे तूप घ्यायचे. तूप जरा गरम करायचे. मग त्यात जिरे घालायचे. जिरं छान फुललं की मग त्यात तांदूळ आणि मूग डाळ घाला. त्यात चमचाभर हळद घाला.
२. चवी पुरते मीठ घाला आणि मग पाणी घालून ढवळून घ्या. पाणी जास्त घाला म्हणजे खिचडी मऊ होते. जरा उकळी आली की मग झाकण लावा आणि नेहमीपेक्षा एखादी शिटी जास्त होऊ द्या. कुकर उघडला की गरमागरम खिचडी घ्या. त्यावर तूप घाला आणि आनंदाने पोटभर खा.