बीट हा रंगाने आकर्षक आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असा पदार्थ आहे. अनेक जण बिटाची चव किंवा मातीसारखा वास म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण योग्य पद्धतीने आहारात समावेश केला तर बीट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. (Feed beetroot to young children every day - beneficial in many ways, from hemoglobin to digestion everything will improve )रोजच्या जेवणात थोड्या प्रमाणात बीट घेतल्यास शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये सहज मिळू शकतात. कच्चे बीट, शिजवलेले किंवा मग कोशिंबीर काहीही असो आहारात बीट असेल तर पोटाला आराम मिळतो. तसेच इतरही अनेक फायदे मिळतात.
बिटामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, फायबर, पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास बीट मदत करते. रक्त वाढीसाठी बीट फायद्याचे आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास बिटाचा आहारात समावेश उपयोगी ठरतो. बीट पचनासाठी चांगले असून बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास बीट मदत करते. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यासही मदत होते. त्वचेसाठी बिटाचा रस लावणेही फायद्याचे असते.
आहारात बिटाचा समावेश करताना तो नेहमीच उकडून किंवा शिजवूनच खाणे अनेकांना सोयीचे वाटते, पण बीट किसून कोशिंबिरीत, भाजीत, सुपमध्ये किंवा पोळीतल्या कणकेत मिसळून त्याचे पराठे करुनही खाता येतात. थोडासा लिंबाचा रस किंवा दही घातल्यास त्याची चव अधिक छान लागते. इतर भाज्यांसोबत बीट वापरु शकता किंवा नुसतेही खाता येते. नियमितपणे थोड्याथोड्या प्रमाणात बिट खाल्ल्यास शरीराला त्याचे फायदे हळूहळू मिळू लागतात.
लहान मुलांच्या आहारात बीट असणं विशेष महत्त्वाचं आहे. वाढत्या वयात मुलांना आयर्न आणि इतर पोषकद्रव्यांची गरज जास्त असते. बिटामुळे मुलांची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि थकवा कमी होतो. तसेच पचन चांगले राहिल्यामुळे मुलांची भूकही सुधारते. बिटाचा नैसर्गिक लालसर रंग मुलांना आकर्षित करतो, त्यामुळे तो वेगवेगळ्या पदार्थांतून दिल्यास मुले सहजपणे तो खातातही. रक्त वाढीची मुलांना गरज असते. त्यासाठी बीट फायद्याचे असते. एकूणच, बीट हा स्वस्त, सहज उपलब्ध आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे. योग्य पद्धतीने आणि कल्पकतेने आहारात समावेश केल्यास बिटाचे फायदे मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही नक्कीच मिळू शकतात.
