सणासुदीला गोडधोड आणि तळणीचे पदार्थ घरात केले जातात. ते पाहून डाएट कॉन्शस लोकांना टेन्शन येतं, पण खाण्याचीही इच्छा असते. यावर उपाय म्हणून आहार तज्ञ सांगतात, योग्य तेलाची निवड केली तर तुम्ही सगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता, अर्थातच प्रमाणात! पण मन मारून आवडते पदार्थ दुर्लक्षित करण्यापेक्षा ते प्रमाणात खाणे केव्हाही चांगले, नाही का? जाणून घेऊया डॉक्टरांचे मत.
बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकघरात रिफाइंड तेलाचा वापर वाढला आहे. आपल्यावर जाहिरातींचा एवढा पगडा असतो की ते तेल खाण्यासाठी आहे असे मानतात आणि त्यात केलेले पदार्थ चवीने खातात. पण तुम्हाला माहित आहे का, की ते तुमच्यासाठी ते हानिकारक असू शकते!
डॉक्टरांच्या सांगतात, आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, घराघरात गोड धोड, तेलातुपाचे पदार्थ केले जातात आणि ते खाण्यासाठी घरातले सगळेच उत्सुक असतात. आपल्या पूर्वजांनी सणवारानुसार या पदार्थांची आखणी केली आहे. ऋतुमानानुसार केलेला आहार कधीच शरीराला बाधत नाही. पावसाळा, हिवाळ्यात शरीराला तेलातुपाचे वंगण हवे असते, ते या पदार्थातून मिळते. म्हणून सण उत्सव हे निमित्त!
मात्र अलीकडे अन्न पदार्थातली भेसळ वाढली आहे आणि लोकांचे प्रमाणात खाणे कमी झाले आहे. उठ सूट पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणारच, त्यातही भेसळयुक्त पदार्थ म्हटल्यावर तब्येतही बिघडणारच! या दोन्हीवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या टिप्स जाणून घेऊ.
आजकाल बाजारात तेलाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, तुम्हाला फक्त योग्य पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. चव आणि आरोग्याची हमी देणाऱ्या तेलाबद्दल जाणून घेऊया. ज्यामुळे पदार्थ होतील रुचकर आणि पौष्टिक!
जेव्हा तेल रिफायनिंग प्रोसेसिंग केले जाते, तेव्हा त्यात हानिकारक ऑक्सिडाइज्ड फॅट्स तयार होतात. जे तुमच्या शरीरातील अणू रेणूंसाठी घातक ठरते आणि त्यामुळे जळजळ वाढते. जेव्हा तेल जास्त गरम केले जाते तेव्हा त्यातून विषारी संयुगे बाहेर पडू लागतात. ज्यामुळे हॉर्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवू शकते आणि त्यामुळे कर्करोग देखील होऊ शकतो. संशोधनातून असे दिसून आले आहे, की रिफाइंड तेलाचा जास्त वापर हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढवू शकतो. या तेलाचा जास्त वापर केल्याने तुमची पचनशक्ती मंदावते. ज्यामुळे तुमचे वजन वेगाने वाढू लागते.
खोबरेल तेल
जर तुम्हाला तळलेले काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही खोबरेल तेल निवडू शकता. त्यात शरीराला उपयोगी फॅट असतात, जे शरीरासाठी हानिकारक नसतात. संशोधनानुसार, खोबरेल तेल जास्त गरम केले तरी ते खराब होत नाही. त्यात शरीरासाठी फायदेशीर फॅटी अॅसिड देखील असतात, जे त्वचेची जळजळ बरी करण्यास मदत करतात.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये चांगले फॅट असतात. जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी चांगले असतात. या तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी होत नाही. परंतु एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मध्ये तळणीचे पदार्थ टाळा. ते हानिकारक असू शकते.
ऍव्होकॅडो ऑइल
ऍव्होकॅडो ऑइल हा तळणीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे तेल पचायला हलके आणि आरोग्यदायी आहे. त्यात तळणीचे पदार्थ तळून खाऊ शकता. मात्र पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थाची चव हवी असेल तर शेवटचा पर्याय कामी येईल. तो म्हणजे...
साजूक तूप
आहार तज्ज्ञांच्या मते, भारतीय आहारात साजूक तुपाचा सर्रास वापर केला जातो. सांधेदुखी आणि पचनासाठी तूप फायदेशीर आहे. शुद्ध तुपामध्ये तळलेले पदार्थ बाधत नाहीत किंवा ऍसिडिटीदेखील होत नाही. तुपामध्ये निरोगी चरबी असतात. ते तुमच्या पोटाचे काम सुरळीत करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.